आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापा‍लिका निवडणुका जाहीर; पहिल्या दिवशी एकाच प्रभागातून 29 हरकती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रभागरचनेबाबत पहिल्या दिवशी एकाच प्रभागातून 29 हरकती आल्या. पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक 28 मधील नगरसेविका रत्ना शिंदे व परिसरातील नागरिकांनी या हरकती सादर केल्या आहेत. उर्वरित नवीन प्रभागांतून मात्र एकही हरकत आलेली नाही.

मनपा प्रशासनाने 23 ऑगस्टला आरक्षणासह नवीन प्रभागरचना जाहीर केली. प्रभागरचनेबाबत हरकती सादर करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. हरकती स्वीकारण्यासाठी शहर, सावेडी, झेंडीगेट व बुरूडगाव या चार प्रभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय आयुक्त कार्यालयातही हरकती सादर करण्याची व्यवस्था आहे.

नव्या प्रभागरचनेत अनेकांची अडचण झाली आहे. त्यामुळे प्रभागरचनेबाबत मोठय़ा प्रमाणात हरकती सादर होण्याची शक्यता होती. मात्र, पहिल्या दिवशी केवळ एकाच प्रभागातून हरकती आल्या. पूर्वीचा वॉर्ड क्रमांक 28 च्या नगरसेविका रत्ना शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी 29 हरकती सादर केल्या आहेत. शिंदे यांचा वॉर्ड तीन ठिकाणी तुटला आहे. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्डातील मोठा भाग प्रभाग 25, 27 व 28 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांची मोठी अडचण झाली असून या पार्श्वभूमीवर त्यांनी हरकती सादर केल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचना तयार करण्यात आल्याने तांत्रिक दोष असलेल्या हरकतींचाच विचार होणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी सादर केलेल्या हरकतींमध्ये काहीच तथ्य नसल्याचेही काही पदाधिकार्‍यांनी सांगितले.

शिंदे यांचा वॉर्ड वगळता पहिल्या दिवशी इतर वॉर्डातून एकही हरकत आली नाही. बुरूडगाव प्रभाग कार्यालयात काही नागरिकांनी सकाळी हरकती सादर केल्या, परंतु हरकतींवर संबंधित व्यक्तींचे नाव व पत्ता नसल्याने सर्व हरकती फेटाळण्यात आल्याचे प्रभाग अधिकारी ई. एम. रणदिवे यांनी सांगितले.

आरक्षण सोडत व प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने पुढील तयारी सुरू केली आहे. मंगळवारी तीन अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यात सावेडीचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी, आस्थापनाप्रमुख अंबादास सोनवणे व वरिष्ठ लिपिक रमेश होलम यांचा समावेश आहे.

तडवी यांच्या जागी आस्थापनाप्रमुख अंबादास सोनवणे यांची बदली करण्यात आली. सोनवणे यांच्या जागी आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक रमेश होलम यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी तीन वेळा झालेल्या पोटनिवडणुकींसाठी तडवी यांनी काम केले आहे. निवडणुकीसंदर्भात चारही प्रभागांची जबाबदारी तडवी यांच्याकडे असेल.

आयुक्त विजय कुलकर्णी यांनी मंगळवारी दुपारी संबंधित अधिकार्‍यांना बदलीचे आदेश दिले आहेत. निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी आणखी काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे.