आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी होणार सव्वादोन कोटी खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाला तब्बल 2 कोटी 25 लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत खर्चात 50 ते 60 लाखांची वाढ होणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या मनपा प्रशासनाला ही रक्कम उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.

नोव्हेंबरच्या अखेरीस होणार्‍या मनपाच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र हेडखाली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मागील निवडणुकीसाठी प्रशासनाने 1 कोटी 80 लाखांची तरतूद केली होती, प्रत्यक्षात मात्र 2 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. या निवडणुकीसाठी सव्वादोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हा खर्च अडीच ते पावणेतीन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यात आली असली, तरी मनपाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च पेलवणारा आहे. आठवडाभरापूर्वी आरक्षणासह जाहीर झालेल्या नवीन प्रभागरचनेमुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी आतापासूनच खर्चाची जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणुकीत किती खर्च करणार, याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे. मनपा प्रशासनासमोर मात्र निवडणूक खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जकात बंद झाल्याने मनपासमोर आर्थिक संकट उभे आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी देखील प्रशासनाला दर महिन्याला तारेवरची कसरत करावी लागते. पगारासाठी अनेकदा पारगमन ठेकेदाराकडून आगाऊ रक्कम घ्यावी लागते. कर्मचार्‍यांना मागील जुलैचा पगार चालू ऑगस्टच्या अखेरीस देण्यात आला. एकीकडे आर्थिक संकट, तर दुसरीकडे निवडणुकीचा कोट्यवधींचा खर्च, यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी प्रशासनाला ही रक्कम उभी करावी लागणार आहे. निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यापूर्वी मनपा कर्मचार्‍यांना पगारासह दिवाळी बोनस अथवा सणअग्रीम द्यावा लागणार आहे.

त्यामुळे सर्व खर्चाची जुळवाजुळव करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहेत. मागील निवडणुकीत 65 वॉर्डांत प्रत्येकी तीन ते चार बूथ लावण्यात आले होते. प्रत्येक बूथवर 4 ते 5 कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीतही सर्व प्रभागांत मिळून शंभरापेक्षा अधिक बूथ असतील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सुमारे पाचशे कर्मचार्‍यांची मागणी करण्यात येणार आहे.

सांगलीप्रमाणे खर्चाची तरतूद
मागील महिन्यात झालेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुमारे अडीच कोटी खर्च आला. नगर महापालिका निवडणुकीसाठी इतकाच खर्च होणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजे सव्वादोन कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे.’’ -डॉ. महेश डोईफोडे, उपायुक्त.

कर्मचार्‍यांवर 30 ते 40 टक्के खर्च
निवडणुकीसाठी नेमण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या मानधनापोटी 30 ते 40 टक्के रक्कम खर्च होणार आहे. उर्वरित रक्कम जागेचे भाडे, मंडप, उमेदवारी अर्ज, गॅझेट, तसेच मतपत्रिकांची छपाई, वाहन, बंदोबस्त, निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची राहण्याची व्यवस्था, स्टेशनरी, मतदान यंत्रे, मतपेट्या आदी बाबींवर खर्च होईल.