आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-फ्रान्स औद्योगिक संबंध वाढीसाठी ‘आमी’चे सहकार्य घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मोठय़ा औद्योगिक विस्तारामुळे फ्रान्समध्ये पुरवठादार विदेशी लघू उद्योजकांचे महत्त्व व मागणी वाढली आहे. त्यामुळे लघू उद्योजकांच्या माध्यमातून भारत-फ्रान्स औद्योगिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिज (आमी) संघटनेचे सहकार्य घेण्यात येईल, असे आश्वासन वायू निर्मिती तंत्रज्ञान व ऊर्जा सल्लागार डॉ. शशी धर्माधिकारी यांनी केले.

मूळचे नगरचे व सध्या फ्रान्समधील भारतीय उद्योजकांच्या संघटनेचे पदाधिकारी असलेले डॉ. धर्माधिकारी यांनी स्नेहालय संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी आमी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला.

उद्योजकांशी झालेल्या चर्चेत डॉ. धर्माधिकारी म्हणाले, समान आंतरराष्ट्रीय संबंध, धोरणे, कुशल मनुष्यबळ आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यामुळे फ्रान्सचा भारताकडे नेहमीच कल राहिला. 1998 मध्ये भारत-फ्रान्समध्ये झालेल्या धोरणात्मक द्विपक्षीय करारानंतर दोन्ही देशांना एकमेकांची बाजारपेठ खुली करण्यात आली. याचा लाभ उठवत फ्रान्समधील 800 पेक्षा अधिक कंपन्यांनी एकूण 8 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात केली आहे. या माध्यमातून दीड लाख भारतीयांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतातील 100 कंपन्यांनीही फ्रान्समध्ये उद्योग, व्यवसाय उभारले आहेत. यात प्रामुख्याने औषधे, सॉफ्टवेअर, वाईन, वाहन या उद्योगांचा समावेश आहे. भारतीय लघू उद्योगांना निर्यातीची मोठी संधी व पोषक वातावरण फ्रान्समध्ये आहे.

भारत-फ्रान्स औद्योगिक संबंध आणखी बळकट होण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असून आमी संघटनेच्या 200 पेक्षा जास्त लघू उद्योजकांचे त्यासाठी मोलाचे योगदान मिळू शकेल, असे डॉ. धर्माधिकारी म्हणाले. आमीच्या पदाधिकार्‍यांची फ्रान्समधील उद्योजकांसमवेत लवकरच भेट घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘आमी’चे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी डॉ. धर्माधिकारी यांचा सत्कार केला. उपाध्यक्ष दौलतराव शिंदे, सचिव मिलिंद एकनाथ कुलकर्णी, सहसचिव संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, मिलिंद दिनकर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.