आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar, Marriage Break Issue At Ahmednagar For DJ Band

डीजेच्या हट्टापायी मोडले लग्न; वरासह पित्याविरुद्ध गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उच्चशिक्षित युवक-युवतीचा विवाह केवळ डीजेच्या हट्टापायी मोडला. वरपक्षाच्या मंडळीनी डीजे नाही तर लग्न नाही, असा हट्ट धरल्याने रविवारी होणारा हा विवाह झाला नाही. याप्रकरणी नवरदेव दीपक अर्जुन मोरे व त्याचे वडील अर्जुन केरू मोरे (नगरपालिका वसाहत, राहुरी) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीलाही या पिता-पुत्राने दांडी मारली.

वधू आणि वर दोघेही संगणक अभियंते. एकाच क्षेत्रातील असल्याने या विवाहास दोघांच्या घरच्यांनी संमती दिली. 3 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करून दोन्हीकडची मंडळी तयारीला लागली. नगरमधील मंगल कार्यालय बुक करण्यात आले. 31 जानेवारीला वरपित्याने वधूपित्याला फोन करून डीजे लावण्याची मागणी केली. रीतिरिवाजाप्रमाणे बँड वा डीजेचा खर्च वरपक्षाकडे असल्याचे वधूपित्याने सांगितले. दोन-तीन दिवस यावर खल झाला. लग्नाच्या आदल्या दिवशी दीपकने डीजे नाही, तर लग्न नाही असा पवित्रा घेतला. वधूपक्षाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. शेवटी नाइलाजाने वधूपिता अरुण रणमले यांनी शनिवारी रात्री तोफखाना पोलिस ठाणे गाठले व दीपक आणि त्याच्या वडिलांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशीसाठी संबंधितांना रविवारी बोलावले; परंतु चौकशीलाही दीपक व त्याच्या वडिलांनी दांडी मारली. उच्चशिक्षित असतानाही केवळ डीजेच्या हट्टापायी लग्न मोडण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.