आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयडीसी विस्तारीकरणासाठी अधिसूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर एमआयडीसीत जागा कमी पडत असल्याने विस्तारीकरणासाठी वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथे 461, नगर व श्रीगोंदे तालुक्यांतील तीन हजार, सुपे 646 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.
जिल्हा उद्योगमित्र समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार अध्यक्षस्थानी होते. आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, मराठा चेंबर ऑफ कॉर्मसचे प्रकाश गांधी यांच्यासह पोलिस व एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी व उद्योजक यावेळी उपस्थित होते.
एमआयडीसीसाठी जमीन संपादित करताना बागायती क्षेत्र वगळले जाणार आहे. या जमिनींच्या मोजणीसाठी पैसेही जमा करण्यात आल्याचे खेडकर त्यांनी सांगितले.
उद्योजक हरजितसिंग वधवा यांनी सुरुवातीसच एमआयडीसीतील नाला बुजवून त्याचे भूखंड तयार करून त्यावर उद्योग सुरू झाले असल्याचे निदर्शनास आणले. हा सर्व प्रकार एमआयडीसीच्या जी 11 विभागात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्याच्या एका बाजूला नाला व दुसर्‍या भागात तो बुजवून तेथे उद्योग उभा राहिल्यामुळे नाल्याला पूर आल्यास स्थिती गंभीर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. याशिवाय एमआयडीसीतील भूखंड वाटपातही गैरव्यवहार झाल्याचा त्यांनी आरोप केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे करणार्‍यांना दंड, 10 वर्षे भूखंड हस्तांतर न करण्याचे बंधन टाकण्याचा विचार सुरू असल्याचे खेडकर यांनी स्पष्ट केले.
मागील बैठकीत सनफार्मा कंपनीसमोर होणारी वाहतूक कोंडी, तसेच तेथील कमानींमुळे अपघात होण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या कमानी हटवण्याची सूचना डॉ. संजीव कुमार यांनी केली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसीचे अधिकारी व पोलिस यांची बैठक होऊन संबंधितांना नोटिसा काढण्यात येणार आहेत. निंबळक ते केडगावदरम्यानच्या बाह्यवळण रस्त्याच्या तीन किलोमीटरच्या टप्प्याचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. ते करण्यास एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी नकार दिला. त्यामुळे ते काम अद्याप तसेच राहिले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
एमआयडीसीतील एल. व एम. ब्लॉकमधील रस्त्याच्या दूरवस्थेचा प्रश्नही वधवा यांनी उपस्थित केला. या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद झाली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर लगेच काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.