आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar MLA Shiwaji Kardile And MLA Vijay Aauti Dispute Issue

आमदार कर्डिले-औटी यांच्यात कलगीतुरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- विमा वाटपाच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्यात कलगीतुरा रंगला. औटी संपर्कात कमी पडतात, अशी कोपरखळी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मारली. औटींनी त्यांच्या या वक्तव्याचा आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला.

बाबुर्डी बेंद (ता. नगर) येथे खंडाळा, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे येथील शेतकर्‍यांना विमावाटपाचा कार्यक्रम शनिवार पार पडला. आमदार कर्डिले म्हणाले, सहकार सभागृहात पिकविमा वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतला यात र्शेय घेण्याचा कोणताही उद्देश नव्हता. यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी विमा हप्ता भरावा यासाठी मार्गदर्शन करणे हा उद्देश होता. त्यासाठी आम्ही शनिवार-रविवारीही जिल्हा बँकेच्या तालुक्यातील शाखा सुरू ठेवल्या. आपण घोसपुरी, बुर्‍हाणनगर या पाणी योजना केल्या, त्या वेळी अनेकांनी विरोध केला, पण त्याच योजना दुष्काळात तालुक्याला जीवनदायी ठरणार आहेत. बुर्‍हाणनगर जशी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केली, तशी घोसपुरी योजना पाणी वाटप समितीकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावी. त्यासाठी औटींनी प्रयत्न करावेत. आपल्या भाषणाच्या अखेरीस कर्डिलेंनी औटींना कोपरखळी मारली. आमदार औटी कामात कमी पडत नाहीत, पण संपर्कात मात्र कमी पडतात. संपर्क आम्ही ठेवतो, तुम्ही कामे करा असे ते म्हणाले.

आमदार औटींनी मग कर्डिलेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. नगर तालुक्याला 8 कोटी पीकविमा, तर पारनेरला 16 कोटी पीकविमा मिळाला, याचे नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे ते म्हणाले. पीकविमा भरण्यासाठी आम्ही लोकांना प्रवृत्त केले. राज्यात 15 तालुके अति दुष्काळी म्हणून घोषित झाले. त्यात पारनेरचा समावेश आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत पारनेरचा समावेश व्हावा यासाठी आम्ही आमदारकीची ताकद पणाला लावली. त्यामुळे 16 कोटी रुपये सिमेंट बंधार्‍यांसाठी मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजनांचा पारनेरच्या प्रस्तावात त्रुटी नसतात. त्यासाठी मी व अधिकारी पाच-पाच तास बसतो तेव्हा लोकांच्या नळाला पाणी येते. परिपूर्ण प्रस्तावामुळे आम्हाला मंत्र्यांच्या दारात जाण्याची आवश्यकता भासत नाही. अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदर कामे यादीत घालण्यासाठी आम्ही मंत्रालयात ठाण मांडतो. इकडे लोकांच्या विवाहात आशीर्वाद देत फिरलो, तर मतदारसंघातील कामे कशी होणार? इतर आमदारांपेक्षा पारनेरमध्ये निश्चित जास्त विकासकामे झाली आहेत, असे औटींनी सुनावले. अडचणीच्या काळात एकत्र येऊन कामे करू या, दुष्काळाचा लढा सर्वांनी मिळून लढू असे आवाहनही त्यांनी केले.