आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका: अहमदनगर शहर अभियंत्याला हवे आहे संरक्षण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे महापालिकेचे शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी नगरसेवकांच्या अरेरावीला वैतागले आहेत. त्यांनी बुधवारी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे संरक्षण व नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या अधिकारांची मागणी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागातून आलेल्या कुलकर्णी यांनी यापूर्वीही मनपाचे शहर अभियंता पद सर्मथपणे सांभाळले होते. आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर असताना त्यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून असलेली ओळख त्यांनी आजही कायम ठेवली आहे. परंतु काही नगरसेवकांच्या अरेरावीमुळे ते मागील पंधरा दिवसांपासून चांगलेच वैतागले आहेत. शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी मिळालेल्या निधीच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वी त्यांच्याशी काही नगरसेवकांनी वाद घातला होता. या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने दुखावलेले कुलकर्णी तडकाफडकी रजेवर निघून गेले होते.

महापौर शीला शिंदे, काही सत्ताधारी नगरसेवक, विविध संघटना, तसेच नागरिकांकडून मनधरणी झाल्याने दुखावलेले कुलकर्णी आठ दिवसांनंतर बुधवारी कामावर हजर झाले. मात्र, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एका कामासंदर्भात अरेरावीची भाषा करून त्यांना पुन्हा दुखावले. त्यामुळे संतापलेल्या कुलकर्णी यांनी थेट आयुक्तांकडे संरक्षण, तसेच अरेरावीची भाषा करणार्‍या नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या अधिकारांची मागणी केली. बोराटे यांच्या वॉर्डातील विशाल गणेश मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्यासाठी 11 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. परंतु त्यापूर्वी ड्रेनेजलाइनचे काम होणे आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते रखडले आहे. या कामाची विचारणा करण्यासाठी बोराटे हे कुलकर्णी यांच्याकडे गेले होते. चर्चेदरम्यान वाद होऊन बोराटे यांनी अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे कुलकर्णी यांनी आयुक्तांना पत्र देऊन संरक्षण, तसेच कारवाईच्या अधिकारांची मागणी केली.

मनपा कार्यालयात यापूर्वी ठेकेदार व नगरसेवकांकडून कर्मचारी व अधिकार्‍यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात सुरक्षेची व्यवस्था केली असली, तरी ती तोकड्या स्वरूपाची आहे. कुलकर्णी यांना नगरसेवकांकडून झालेल्या अरेरावीमुळे मनपा कार्यालयातील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहर अभियंता हेकेखोर
"शहर अभियंता कुलकर्णी यांच्याकडे विशाल गणेश मंदिर परिसरातील ड्रेनेजलाइनसंदर्भात विचारणा केली. हेकेखोर उत्तर मिळाले. ते मोठय़ा ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करतात. प्रसिध्दीची हाव असल्यामुळेच त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. ’’
- बाळासाहेब बोराटे, नगरसेवक

वादाबाबत आयुक्त अनभिज्ञ
"शहर अभियंता कुलकर्णी यांचे कामावर रुजू झाल्याचे पत्र मला मिळाले, परंतु नगरसेवकाशी त्यांच्या झालेल्या वादाबाबत मला काहीच माहिती मिळालेली नाही. कामानिमित्त मी बाहेर होतो, त्यामुळे त्यांनी दिलेले संरक्षणाच्या मागणीचे पत्र अजून मिळालेले नाही.’’
-विजय कुलकर्णी, आयुक्त

झगडे यांनी सूत्रे स्वीकारली
बदलीच्या प्रयत्नांत असलेल्या उपायुक्त स्मिता झगडे प्रदीर्घ रजेनंतर बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. गेल्या दहा दिवसांपासून त्या कार्यालयात कामाशिवाय बसून होत्या. पदाची सूत्रे स्वीकारली असली, तरी बदलीची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना बुधवारी सांगितले.

काम करणे कठीण झाले
"काही नगरसेवकांकडून अधिकार्‍यांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे काम करणे कठीण झाले आहे. बोराटे यांनी बुधवारी कामावरून वाद घातला. अशा नगरसेवकांपासून संरक्षण व त्यांच्यावरील कारवाईचे अधिकार असणे आवश्यक आहे.’’
-एन. डी. कुलकर्णी, शहर अभियंता