आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारफलक लावण्याबाबत उमेदवारांसमोर पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीतील प्रचाराचे फलक लावण्याकरिता उमेदवारांमध्ये अहमहमिका लागली आहे. पण आचारसंहिता समितीने घातलेल्या अटींमुळे उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. या अटींची पूर्तता करुन फलक लावायचे कसे, असा पेच सर्वच पक्षांच्या उमेदवारांना पडला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचाराबाबत घातलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. त्याकरिता उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिस, उपप्रादेशिक परिवहन, महावितरण, भारत संचार, महापालिका व इतर शासकीय कार्यालयांतील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार आल्यास किंवा आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे समिती सदस्यांना दिसल्यास संबंधित उमेदवारांवर गुन्ह्याची नोंद केली जात आहे.
यावेळी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी केवळ दोन फलक लावण्याची परवानगी समितीने दिली आहे. शिवाय हे फलक सार्वजनिक किंवा शासकीय ठिकाणी लावण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे हे फलक केवळ खासगी जागेवरच लावता येतील. त्यासाठी संबंधीत जागामालकाचे ना हरकत प्रमाणपत्र व सात-बारा उताराही सादर करणे बंधनकारक आहे. या अटींमुळे उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण खासगी जागेत फलक उभारण्यासाठी संबंधितांची मनधरणी करता करता उमेदवारांच्या नाकीनव आले आहेत. त्यामुळे ऐन प्रचाराच्या धामधुमीत उमेदवारांच्या प्रचाराचे फलक गायब झाले आहेत.