आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation Election Congress Vs BJP

अहमदनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेससमोर भाजपचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रभाग 34 मधील सर्वसाधारण जागेसाठी लोंढे यांच्याविरोधात काँग्रेसचे संजयकुमार लोंढे, मनसेचे शिवाजी कोतकर, तसेच अपक्ष उमेदवार मनोज कोतकर, गणेश लोंढे, प्रमोद ठुबे व शरद ठुबे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लोंढे यांनी प्रभागासाठी भरीव काम केले आहे. लोंढे यांनी यापूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणूक लढवली होती. परंतु दोन्ही निवडणुकांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, 2008 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना नागरिकांनी नगरसेवकपदाची संधी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी प्रभागात जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर भर दिला. वेळप्रसंगी विविध आंदोलनांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवले. त्यामुळे त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क निर्माण झाला आहे. त्यामुळे लोंढे यांच्या पराभवासाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासह काही अपक्ष उमेदवारांची फौजही निवडणूक रिंगणात उतरवली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक लोंढे यांना पुन्हा संधी देणार का? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रभागातील महिला जागेवर भाजपच्या प्रियंका निकाळजे यांच्याविरोधात काँग्रेसच्या सुनीता कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोघींमध्ये सरळ लढत होणार आहे. शिवाय मनसेच्या लीलाबाई कांबळे यांनी देखील महिला राखीव जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रभागातील दोन्ही जागांवर रंगतदार लढत होणार आहे.
प्रभागाचा कायापालट झाला..
केडगावचा महापालिकेत समावेश झाला, तरी प्रभागातील अवस्था खेड्यासारखीच होती. परंतु 2008 मध्ये निवडून आल्यानंतर प्रभागाचा कायापालट केला. केडगाव पाणी योजना असो की, चोर्‍यांची समस्या, हे प्रश्न सोडवले. केवळ प्रभागासाठीच नाही, तर केडगाव विकासासाठी महापालिकेत नेहमीच भांडलो. अजून खूप विकासकामे करायची आहेत, त्यासाठी नागरिक पुन्हा निवडूून देतील, याची खात्री आहे.
-शिवाजी लोंढे, नगरसेवक, भाजप.
नागरिकांचा भाजपवर विश्वास
भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे नागरिक भाजप उमेदवारांनाच संधी देतील, याची खात्री आहे. काँग्रेसने प्रभागातील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवारच प्रभागाचा विकास करतील, असा नागरिकांना विश्वास आहे. निवडून आल्यानंतर प्रभागासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विकासकामे मार्गी लावणार आहे.
-प्रियंका निकाळजे, उमेदवार, भाजप.
महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष
केडगावचा महापालिकेत समावेश झाला असला, तरी प्रशासनाने येथील सोयी, सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यात प्रभाग 34 चा देखील समावेश आहे. प्रभागाचे क्षेत्रफळ जास्त असून नवीन वसाहती मोठय़ा प्रमाणात उभ्या राहत आहेत. दहा वर्षांपूर्वी प्रभागात पिण्याचे पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट अशा अनेक समस्या होत्या. मात्र, मागील पाच वर्षांत नगरसेवक शिवाजी लोंढेंनी प्रभागातील काही समस्या दूर केल्या आहेत. महापालिकेकडून निधीसाठी वेळोवेळी डावलण्यात आल्याने या प्रभागातील रस्ते व ड्रेनेजची समस्या अजूनही कायम आहे.