आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडतर्फ नेत्यासमोर राष्ट्रीय नेतृत्व खुजे, काँग्रेसची अनोखी तर्‍हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केडगाव परिसरात काँग्रेसचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारफेर्‍या व प्रचाराच्या वाहनांनी उपनगरात राळ उठवली आहे. मात्र, पक्षातून बडतर्फ केलेल्या नेत्याचे छायाचित्र काँग्रेसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची उंची खुजी करत आहेत.
काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावून पदरात पाडून घेतलेल्या केडगावच्या सात जागा जिंकण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे. राष्ट्रवादीला दिलेल्या आठव्या जागेवर आपलाच उमेदवार देण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे. आटापिटा करून वाट्याला आलेल्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. केडगाव सध्या फलक, प्रचाराची वाहने व प्रचारफेर्‍यांनी व्यापून गेले आहे. वातावरणनिर्मिती करण्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचे विरोधकही मान्य करत आहेत. युतीच्या उमेदवारांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.
शेवगावचा लॉटरीविक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणात काँग्रेसचा तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकरला सप्टेंबर 2011 मध्ये अटक झाली. तेव्हापासून तो कोठडीत आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीने त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. कोतकरशी पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांच्याच पक्षातील नेते सांगत आहेत. मात्र, केडगावातील काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी भानुदास कोतकरच आहे. प्रचार वाहनांवर लावलेले फलक याचे द्योतक आहेत. कोतकरच्या प्रतिमेसमोर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिग्गज नेते खुजे झाले आहेत. बडतर्फ नेत्याचे छायाचित्र प्रचारफलकावर छापल्याने मतदारांमध्येही संभ्रम आहे. एकतर पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे किंवा कोतकरने पक्ष सोडला नसल्याचा संदेश या प्रचारफलकांमधून मतदारांमध्ये जात आहे.