आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टांगती तलवार: सर्वच पक्षांनी आयोगाचे आदेश धुडकावले !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षांनी 20 व्या दिवशी पहिल्या टप्प्यातील खर्च महापालिका आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, मनपा निवडणूक लढवणार्‍या सर्वच राजकीय पक्षांनी हा आदेश धुडकावला आहे. कोणीही पहिल्या टप्प्याचा खर्च सादर केलेला नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, बसपा आदी पक्ष निवडणूक लढवत आहेत. उमेदवारांसाठी प्रचाराच्या खर्चाची र्मयादा 3 लाख रुपये आहे. या र्मयादेपेक्षा अधिक खर्च करणार्‍या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्याचे, तसेच त्यांना काही कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचे अधिकार आयोगाला आहेत. दररोजचा खर्च दुसर्‍या दिवशी दुपारी दोनपर्यंत सादर करावा लागतो. हा नियम न पाळणार्‍या उमेदवारांना नोटीस बजावण्यात येते. नोटिशींना न जुमानणार्‍या उमेदवारांवर कारवाई केली जाते. उमेदवारांबरोबरच पक्षांचा खर्च स्वतंत्रपणे सादर केला जातो. पक्षांनी दिलेल्या खर्चाचे विभाजन पक्ष म्हणेल त्या प्रमाणात उमेदवारांमध्ये विभागला जातो.
निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2006 च्या आदेशानुसार आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर 20 व्या दिवशी पक्षांनी त्यांचा पहिल्या टप्प्यातील खर्च सादर करणे बंधनकारक आहे. हाच आदेश राज्य शासनाच्या राजपत्रात 30 डिसेंबर 2006 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील खर्च आचारसंहिता सुरू झाल्यापासून 35 व्या दिवशी, तर अंतिम खर्च निकालानंतर तीन दिवसांत जमा करणे बंधनकारक आहे. मनपा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. आयोगाच्या आदेशानुसार 27 नोव्हेंबरपर्यंत सर्व पक्षांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर करणे आवश्यक होते. 19 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 20 दिवस गृहित धरल्यास 8 डिसेंबरला ही मुदत संपते. मात्र, अद्याप एकाही पक्षाने पहिल्या टप्प्यातील खर्च आयुक्तांकडे सादर केलेला नाही.