आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका ‘भयमुक्त’ करा; संग्राम जगताप यांचे सत्ताधार्‍यांवर ताशेरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेतील कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. ‘भयमुक्ती’च्या गप्पा मारणार्‍यांची सत्ता असताना महापालिकेलाच भयमुक्तीची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर संग्राम जगताप यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.

काही महिन्यांपूर्वी मनपा कर्मचार्‍यांवर हल्ले झाले. हा प्रकार गंभीर असून अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भयमुक्तीच्या गप्पा मारणार्‍यांच्या सत्ताकाळातच असे होत असेल, तर संपूर्ण महापालिकेलाच संरक्षणाची गरज आहे, असे जगताप म्हणाले.

मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते. यावर उपाय म्हणून कठोर वसुली मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. मी महापौर असताना सुमारे 40 कोटींची वसुली केली होती. नागरिक आताही थकबाकी भरायला तयार आहेत, पण त्यासाठी त्यांना हप्त्यांची सवलत दिली जात नाही. वसुली करताना राजकीय हस्तक्षेप होतो अशी आवई अधिकार्‍यांकडून उठवली जाते. प्रत्यक्षात अधिकार्‍यांनी त्यांचे अधिकार वापरल्यास शंभर टक्के वसुली होईल, परंतु त्यांचीच तशी मानसिकता नाही.

दिल्ली दरवाजाबाहेरचे गाळे पाडताना आमदार अनिल राठोड यांनी विरोध करून गाळेधारकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही बेग पटांगणात टपरी मार्केटचे नियोजन करून तेथे या गाळेधारकांची व्यवस्था केली, परंतु विद्यमान सत्ताधार्‍यांनी काहीच केले नाही. जर त्यांना टपरी द्यायची नसेल, तर घेतलेले 60 हजार रुपये व्याजासह परत करावेत, असे जगताप म्हणाले.