आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाजपत्रक: अहमदनगरात करवाढीचा प्रस्ताव स्थायीने फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्थायी समितीने 2013-2014 च्या अंदाजपत्रकातील वृक्षकर, जललाभ व मललाभ कराची दरवाढ, तसेच नव्या अग्निशामक कराचा प्रस्ताव फेटाळला. विविध विकासकामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी थकीत बिलांसाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या 408.91 कोटींच्या अंदाजपत्रकावर स्थायीच्या सभेत सलग दोन दिवस चर्चा झाली. सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही चर्चा मंगळवारी सायंकाळी संपली. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात नगरोत्थान, पाणीपुरवठा, घरकुल, तसेच भुयारी गटारीसारख्या योजनांवर भर देऊन काही करांमध्ये दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्थायीने मात्र करवाढीचा प्रस्ताव फेटाळत रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. चालू वर्षी उशिरा मंजुरी दिलेल्या विकासकामांचा खर्च अंदाजपत्रकात कसा समाविष्ट करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा सादर केल्याशिवाय सभा सुरू करू नये, अशी सूचना सदस्यांनी मांडली. त्यामुळे पहिल्या दिवशी तहकूब केलेली सभा मंगळवारी सकाळी सुरू झाली. मात्र, अधिकारी वेळेवेर न आल्याने सभा सकाळी अध्र्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या सभेत स्थायी सदस्यांनी प्रलंबित कामांच्या प्रश्नावर चर्चा केली. शहरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी 22 कोटींची तरतूद करण्याची शिफारस सदस्यांनी केली. त्यानंतर जमा बाजूवर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून 48 कोटींचे उत्पन्न दर्शवले आहे. यापेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना स्थायीने केली. वृक्षकर, जललाभ व मललाभ करात दरवाढ, तसेच नव्याने अग्निशामक कराची आकारणी करण्याचा प्रस्ताव अंदाजपत्रकात होता. त्यामुळे नागरिकांवर पाच टक्के कराचा बोजा पडणार होता. परंतु स्थायीने हा दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून नागरिकांना दिलासा दिला आहे.

काही सदस्यांनी अनाधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा उपस्थित केला. जाहिरात फलकांचे खासगीकरण करून त्याचे दर दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली. 70 टक्के गुण मिळवणार्‍या मनपा कर्मचार्‍यांच्या पाल्यांसाठी 50 हजारांची तरतूद, कचरा संकलन करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांसाठी सावेडीत डिझेल भरण्याची व्यवस्था, मनपाच्या गाळ्यांचे हस्तांतरण यासारख्या शिफारशीही करण्यात आल्या.

पदाधिकारी व नगरसेवकांसाठी तरतूद
नगरसेवक व वॉर्ड निधी 10 लाख, महापौर निधी 4 कोटी, उपमहापौर निधी 25 लाख, महिला व बालकल्याण सभापती 15 लाख, महिला व बालकल्याण उपसभापती 10 लाख, स्थायी समिती सभापती 25 लाख.

जानेवारीचा पगार व दिवाळी अग्रीमसाठी मनपा कामगार संघटनेची निदर्शने
जानेवारीचा पगार आणि पाच हजार रुपयांच्या प्रलंबित दिवाळी सण अग्रीमच्या मागणीसाठी मनपा कामगार संघटनेने स्थायीची सभा सुरू असताना सभागृहाबाहेर निदर्शने केली. त्यापूर्वी संघटनेने मनपाच्या सर्व विभागांतील कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालयांना कड्या लावल्या. दुपारी उशिरापर्यंत आंदोलक सभागृहाबाहेर ठाण मांडून होते. निदर्शने करणार्‍या आंदोलकांनी दुपारी आलेला नाश्ताही अडवला. आम्हीच उपाशी आहोत, तर मनपाच्या कारभार्‍यांसाठी नाश्ता कशासाठी, असा पवित्रा त्यांनी घेतला. कर्मचार्‍यांना पगार नसताना काजू-बदामाचा नाष्टा करणार्‍या पदाधिकार्‍यांचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सभा दुपारी तहकूब होतच स्थायी सदस्यांनी दाबून नाश्ता केला. आंदोलक सभागृहाबाहेर बसूनच होते.