आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांना जमेल तेवढी बिले देणार; उपायुक्त डॉ. डोईफोडेंची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मालमत्ता कराच्या वसुलीतून ठेकेदारांना जमेल तेवढे पैसे देण्यात येणार आहेत. वसुलीच्या रकमेतून इतर खर्च जाऊन जी रक्कम उरेल, त्यातून ठेकेदारांची प्रलंबित बिले देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी सोमवारी दिली.

ठेकेदारांनी केलेल्या शहरातील विविध विकासकामांचे सुमारे 20 कोटींचे पाचशेपेक्षा अधिक बिले मनपाच्या लेखा विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यासाठी मार्चअखेर 6 ते 7 कोटींची व्यवस्था करू, असे आश्वासन आयुक्त विजय कुलकर्णी यांनी ठेकेदार संघटनेला काही दिवसांपूर्वीच दिले होते. परंतु मार्च महिना संपत आला, तरी ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ठेकेदारांना बिले मिळालेली नाहीत. त्यातील सुमारे साडेचारशे बिले 5 ते 10 लाखांपर्यंतची आहेत. प्रत्येक बिलातून ठेकेदारांना कमीत कमी दोन लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव ठेकेदार संघटनेने आयुक्तांना दिलेला आहे. मात्र, मनपाची सध्याची आर्थिक स्थिती पहात थकीत बिले मिळतील की नाही, अशी भीती ठेकेदारांमध्ये निर्माण झाली आहे. मार्चअखेर थोडेफार पैसे मिळतील, अशी अपेक्षा आयुक्तांच्या आश्वासनामुळे निर्माण झाली होती. परंतु मार्च महिना संपत आल्याने ठेकेदारांची अपेक्षा मावळली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी सोमवारी सकाळी उपायुक्त डोईफोडे यांच्याशी चर्चा करून प्रलंबित बिलांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी डोईफोडे म्हणाले, प्रलंबित बिलांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीतून जास्तीत जास्त प्रलंबित बिले निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व ठेकेदारांना समान न्याय मिळेल, त्यामुळे ठेकेदारांनी लेखा विभागात जाऊन कोणताही गोंधळ घालू नये, अशी विनंती डोईफोडे यांनी ठेकेदारांना केली. पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्याने ठेकेदारांनीही यावेळी संयमाची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना डोईफोडे म्हणाले, मालमत्ता कराच्या वसुलीतून ठेकेदारांचे जमेल तेवढी प्रलंबित बिले देण्यात येणार आहेत. उर्वरित बिले थकीतमध्ये न जाता त्यांची नवीन अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. मालमत्ता कराच्या वसुलीतून कर्मचार्‍यांच्या पगारासह इतर खर्च करण्यात येणार आहे. उरलेल्या रकमेतून ठेकेदारांची जमेल तेवढी बिले देण्यात येतील. परंतु त्यासाठी नक्की किती रुपयांची तरतूद करता येईल, ते मात्र मालमत्ता कराच्या वसुलीवर अवलंबून असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.

ठेकेदार कामे घेण्यास तयार नाही, नगरसेवक हैराण
मनपाच्या तिजोरीत पैसे नसल्याने तसेच प्रलंबित बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी नवीन कामे घेणे बंद केले आहे. सध्या शहरात नगरसेवक व वॉर्ड विकास निधीतून मोठय़ा प्रमाणात कामे मंजूर झाली आहेत. निवडणूक जवळ आल्याने ही कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. परंतु ठेकेदार कामे घेण्यास तयार नसल्याने नगरसेवकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कामांना मंजुरी आहे, पण ठेकेदार ही कामे करण्यास तयार नसल्याने नगरसेवक हैराण झाले आहेत.

पैशांचा अंदाज घेऊनच कामे
"उपायुक्तांशी झालेल्या चर्चेत त्यांनी पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी 30 मार्चला बैठक घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाने पैशांचा अंदाज घेऊनच कामे मंजूर केली पाहिजेत.’’
- राजेंद्र लोणकर, अध्यक्ष, ठेकेदार संघटना.