आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी संग्राम जगताप यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी संग्राम जगताप यांचे नाव जाहीर केले. पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी बुधवारी रात्री 8 वाजता पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आदेशानुसारच हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या उपमहापौरपदाच्या मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असल्याचेही काकडे यांनी सांगितले.
महापौरपदासाठी उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पदाधिकार्‍यांची सायंकाळी बैठक झाली. काकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आमदार अरुण जगताप, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शंकरराव घुले आदी उपस्थित होते. सर्व स्थानिक पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून महापौरपदासाठी जगताप यांचे नाव निश्चित करण्यात आले.
पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले, ज्या पक्षाच्या जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे राज्यातील सूत्र आहे. त्याप्रमाणे महापालिकेत सर्वाधिक 18 जागा मिळवणार्‍या राष्ट्रवादीला महापौरपदावर बसण्याचा अधिकार आहे. या पदासाठी तीन-चार नावे चर्चेत होती. परंतु स्थानिक पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मागणीनुसार जगताप यांचे नाव निश्चित करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष जाधव यांच्याशी अंतिम चर्चा झाली असल्याचे काकडे यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढवली. यापुढे आघाडी कायम राहणार आहे. काँग्रेसने उपमहापौरपदाची मागणी केली होती. त्यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समिती व स्थायी समितीच्या पदांबाबत मात्र नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांत कोणताही वाद नसून पाच वर्षे एकत्रित काम करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी काँग्रेसची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जगताप यांचे नाव जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेसच्या बैठकीत सामील झाले.