नगर - नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शिवसेनेने आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयावर शनिवारी मोर्चा नेला. यावेळी राठोड यांनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका करत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 12 तासांची मुदत दिली. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिका-यांना मनपा कार्यालयात बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महापौर संग्राम जगताप यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन राठोड यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीमुळेच राठोड यांना पाणीप्रश्न आठवला असल्याचा टोला जगताप यांनी मारला.
मागील चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी महापालिका कार्यालयावर मटका फोड मोर्चा काढला. आमदार राठोड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, विक्रम राठोड, नगरसेविका मनीषा बारस्कर, मालन ढोणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलक मनपा कार्यालयात घुसू नयेत, यासाठी सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती. परंतु कुणालाही न जुमानता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही प्रवेशद्वारे उचकटून आत प्रवेश केला. कार्यालयाच्या आवारात माठ फोडण्यात आले. नंतर आंदोलकांनी थेट आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनात शिरून घोषणाबाजी सुरू केली. पाणीप्रश्नावरून आयुक्तांना धारेवर धरण्यात आले. काही शिवसैनिकांनी त्यांना माठ भेट देऊन संताप व्यक्त केला. ज्यांना मते दिली, त्यांच्याकडे जाऊन पाणी मागा, असे उत्तर कर्मचारी देत असल्याची तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली.
आयुक्तांचे म्हणणे ऐकून घेण्यास शिवसैनिक तयार नव्हते. येत्या बारा तासांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आयुक्तांसह अधिका-यांना मनपा कार्यालयातील खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा राठोड यांनी दिला.
... ही तर कौटुंबिक मनपा
सत्ताधा-यांनी महापालिका लुटून खाल्ली आहे. ठरावीक लोकांनाच पाणी मिळते. ही कौटुंबिक महापालिका झाली आहे. चुकीच्या ठेकेदाराला काम दिल्याने ‘फेज टू’ची वाट लागली. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर अधिका-यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असे राठोड म्हणाले.
... तुमचे हात कुणी धरले होते?
पत्रकार परिषदेत महापौर जगताप म्हणाले, आम्ही ‘फेज टू’ मंजूर करून आणली, परंतु युतीला ती अडीच वर्षांत पूर्ण करता आली नाही. जर ठेकेदार चुकीचा होता, तर त्याला जाब न विचारता उलट मुदतवाढ का दिली? आम्ही आता ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली. अडीच वर्षांत तुमचे हात कुणी धरले होते? विधानसभा निवडणुकीमुळेच राठोड यांनी पाणीप्रश्नाचे भांडवल केले आहे.