आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation News In Marathi, Renewal Urban Scheme, Divya Marathi

मनपा प्रशासनाला अखेर पथदिव्यांच्या चुका मान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरोत्थान योजनेअंतर्गत पथदिवे उभारण्याच्या कामात चुका झाल्याचे महापालिका प्रशासनाने अखेर मान्य केले. एका ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन या प्रश्नाचा पाठपुरावा करणार्‍या युगंधर प्रतिष्ठानला उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिले. येत्या मंगळवारी (18 मार्च) या कामाची संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे.
पथदिव्यांच्या कामात ठेकेदाराने मोठय़ा प्रमाणात त्रुटी ठेवल्याचे ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी समोर आणले. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करताना त्रुटी ठेवणार्‍या ठेकेदारांना मनपा प्रशासनाने कायम पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. आता मात्र युगंधर प्रतिष्ठानला दिलेल्या पत्रात उपायुक्त डॉ. डोईफोडे यांनी मेसर्स उरमुडे इलेक्ट्रोमेक कंपनी या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
निविदेतील शर्तीनुसार खांब रोवण्यासाठी ठेकेदाराने 60 गुणिले 60 सेंटिमीटर व दीड मीटर खोल खड्डा खणणे आवश्यक होते. सिमेंट काँक्रिट व विशिष्ट जाडीची खडी वापरणे बंधनकारक होते. ठेकेदाराने त्यानुसार खड्डे खोदलेले नाहीत. मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत या तक्रारीत तथ्य आढळले आहे. निविदेतील शर्तीनुसार 3 फूट खड्डा खोदून केबल टाकणे बंधनकारक होते. हा खड्डा बुजवण्यासाठी चाळलेली वाळू, नंतर विटांचा थर, त्यानंतर विनादगड माती व मुरमाचा थर टाकणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने जमिनीलगत जी. आय. पाइपमधून केबल टाकली. मनपा प्रशासनाने ही त्रुटी मान्य केली. ठेकेदाराला तसे लेखी कळवण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. संबंधित कामाचा पार्टरेट करून बिलात वसूल करण्याबरोबरच निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
तीन मुद्दय़ांवर चुका मान्य करणार्‍या प्रशासनाने इतर सात मुद्दय़ांबाबत पळवाट शोधली आहे. खांबाचे वजन, खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, केबलची जाडी आदी मुद्दय़ांवर ठेकेदाराला पाठीशी घालणारा खुलासा प्रशासनाने केला आहे.
मनपाचे विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे यांनी शनिवारी युगंधर प्रतिष्ठानच्या प्रदीप ढाकणे यांना संयुक्त पाहणीबाबत पत्र दिले. झोपडी कॅन्टीननजीकच्या माउली संकुलासमोर चोरीला गेलेल्या खांबाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी चार वाजता संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. अशी पाहणी व्हावी, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
निविदेनुसार कामे नाहीत
निविदेतील शर्तीनुसार ठेकेदाराकडून कामे करवून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, अधिकार्‍यांनी कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. ठेकेदार व अधिकार्‍यांमध्ये मिलीभगत असून यातूनच ठेकेदाराने निविदा कलमानुसार कामे केली नाहीत. त्यामुळे ठेकेदारबरोबरच अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी. उपठेकेदाराला बळीचा बकरा करून मोठय़ा माशांना वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. संयुक्त पाहणीतून ठेकेदार व अधिकार्‍यांची मिलीभगत उघडकीस येणार आहे.’’ प्रदीप ढाकणे, संयोजक, युगंधर प्रतिष्ठान.
न्यायालयात दाद मागणार
संयुक्त पाहणी म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. आरोप असणार्‍या अधिकार्‍यांकडून पाहणी कितपत संयुक्तिक आहे? सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करून घेतले. मात्र, या अहवालात अधिकारी व ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आले. हा अहवाल प्रशासनाने नाकारावा. तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांमध्ये मिलीभगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.’’ शाकीर शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते.
सुरुवातीपासूनच कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
सन 2012-13 मध्ये पथदिवे उभारण्याचे काम करण्यात आले. सुमारे दहा कोटी त्यावर खर्च करण्यात आले. यातील आणखी काही कामे अजून प्रलंबित आहेत. कामाला सुरुवात झाल्यापासून दर्जाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या कामाचा त्रयस्थ संस्था असलेल्या पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून लेखापरीक्षण करून घेण्यात आले आहे. अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला असून कार्यवाही प्रलंबित आहे.