आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation Teacher Payment Issue

कुचंबणा: पगार नसल्याने अहमदनगर मनपा शिक्षकांची उपासमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांची सध्या उपासमार सुरू आहे. या शिक्षकांच्या पगाराचे तब्बल 1 कोटी 75 लाख रुपये मनपाने थकवले आहेत. मागील 4 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने संसार चालवायचा तरी कसा असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांच्या पगारासाठी मिळणारे 50 टक्के शासकीय अनुदान मनपाने दुसरीकडेच खर्च केल्याचा संशय शिक्षक व्यक्त करीत आहेत.

मनपाच्या 12 शाळांमध्ये सुमारे 1 हजार 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत या शाळांमध्ये सुविधा नसल्या, तरी ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. तेथील 36 शिक्षकांची मात्र मनपाने उपेक्षा केली आहे. अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या या शिक्षकांच्या कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अनेकांनी बँका, तसेच पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे. पगारच नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. एकीकडे कर्जाचा वाढता डोंगर, तर दुसरीकडे पगाराची प्रतीक्षा करण्यापलीकडे शिक्षकांच्या हाती काहीच उरलेले नाही.

निवृत्त झालेले. तसेच सध्या सेवेत असलेल्या 36 शिक्षकांच्या पगारापोटी दर महिन्याला सुमारे 25 लाख रुपये खर्च होतात. त्यापैकी 50 टक्के अनुदान शासनाकडून मिळते, तर 50 टक्के रक्कम मनपाला द्यावी लागते. मात्र, स्वहिश्याची रक्कम तर सोडाच, शासनाकडून मिळणारे 50 टक्के अनुदानही मनपा दुसरीकडेच खर्च करीत असल्याचा संशय शिक्षकांनी व्यक्त केला आहे. थकीत पगार मिळावा, अशी मागणी शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. परंतु अधिकारी व पदाधिकार्‍यांनी त्यांना केवळ आश्वासनेच दिली. हतबल झालेले शिक्षक कशीतरी उसनवारी करून घर चालवत आहेत. मनपा कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे प्रशासनाने कर्मचार्‍यांचा डिसेंबरचा थकीत पगार देण्यासाठी तातडीने व्यवस्था केली. परंतु चार महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांचा साधा विचारही प्रशासनाने केलेला नाही. मनपाच्या शाळांचे गोडवे गाणार्‍या पदाधिकारी व नगरसेवकांनीही शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

शंभर टक्के अनुदान मिळावे
यापूर्वी शिक्षकांचे पगार कधीच थकले नव्हते. आतापर्यंत शासनाकडून मिळालेल्या 50 टक्के अनुदानातून शिक्षकांचे पगार देण्यात आले आहेत. मनपाकडून उर्वरित 50 टक्के निधी उपलब्ध व्हावा, यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. हा निधी मिळत नसल्याने चार महिन्यांपासून पगार थकले आहेत. खासगी शाळांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांनाही शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळाले पाहिजे.’’
-सतीश धाडगे, सभापती, मनपा शिक्षण मंडळ.

अपेक्षा फोल ठरली..
आयुक्त, महापौरांना भेटलो. एका महिन्याचा तरी पगार मिळेल, अशी अपेक्षा होती. तथापि, ती फोल ठरली. पगार नसल्याने घर चालवणे कठीण झाले आहे. शिक्षणसेवक म्हणून सेवेत असलेल्या शिक्षकांवर तर चक्क नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. तातडीने थकीत पगार द्यावा.’’
-सुभाष कुबडे, शाखाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.

अहवाल वरिष्ठांकडे
शासनाकडून मिळणारे अनुदान आणि मनपाकडून मिळणारी रक्कम जशी उपलब्ध होईल, त्यानुसार पगार होतील. निवृत्त शिक्षक व सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना कधी-कधी दोन टप्प्यांतही पगार दिले जातात. थकीत पगाराबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.’’
-सुधाकर शिदोरे, प्रशासकीय अधिकरी, मनपा शिक्षण मंडळ.