नगर- महापालिकेत दोन टर्म महापौरपदी असताना सहाशे कोटी रुपयांच्या निधीचे काय केले, याचा हिशेब काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी द्यावा, मगच आमदार अनिल राठोड यांच्यावर टीका करावी, असे शिवसेनेचे नगरसेवक संजय शेंडगे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
नगर शहर 25 वर्षांपासून विकासापासून दूर असल्याची टीका विरोधक करत आहेत. राठोड यांना दरवर्षी केवळ दोन कोटींचा निधी मिळतो. हा निधी एखाद्या रस्त्याच्या कामासाठी खर्च केला, तरी संपून जातो. महापालिकेचा दरवर्षीचा अर्थसंकल्प चारशे कोटींपेक्षा अधिक असतो. त्यापैकी 72 कोटींचा प्रशासकीय खर्च वगळता इतर पैसे विकासकामांवर खर्च होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचा महापौर असताना कोणती विकासकामे झाली ते दाखवून द्यावे, असे आवाहन शेंडगे यांनी केले.
मनपात सेनेची सत्ता असताना महापौर शीला शिंदे यांनी नगरोत्थानची कामे मार्गी लावली. राष्ट्रवादीची सत्ता असताना या कामांची दीड वर्ष निविदा काढण्यात आली नाही. सेनेची सत्ता असताना महापालिकेत प्रथमच ऑनलाइन निविदा पध्दत सुरू झाली. नगरोत्थानची कामेदेखील शिवसेनेनेच मार्गी लावली, तरीदेखील राष्ट्रवादीचे पदाधिकारी या कामांची उदघाटने करून
आपली पाठ थोपटून घेत आहेत. घरकुल योजनेसाठी 31 कोटींचा निधीदेखील सेनेच्या महापौर शीला शिंदे यांनीच आणला. शहर सुधारित पाणीपुरवठा (फेज टू) योजनेच्या कामासाठीदेखील शिवसेनेच्या पदाधिका-यांनीच पाठपुरावा केला. तरुणांसाठी राज्यात आदर्श उपक्रम ठरलेले महापालिकेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शिवसेनेच्या काळातच सुरू झाले. राठोड व महापौर शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मूलभूत सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून 20 कोटी रुपयांचा निधी आला, परंतु सत्ता बदल झाल्यानंतर हा निधी वर्षभरापासून पडून आहे, असे असतानाही हेच सत्ताधारी विकासाच्या गप्पा मारत आहेत, अशी टीका शेंडगे यांनी केली.