नगर - महापालिकेची स्थायी समिती, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अपक्ष व काँग्रेस उमेदवारांनी अर्ज नेले आहेत, परंतु अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (3 मार्च) दुपारी दोनपर्यंत मुदत आहे. मंगळवारी (4 मार्च) होणार्या विशेष सभेत सभापतींची निवड होईल. निवडणूक रिंगणात कोण राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी, तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती-उपसभापतिपदाची निवड मंगळवारी विशेष सभेत होणार आहे. या पदांसाठी 28 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. मनसेचे किशोर डागवाले, काँग्रेसच्या सुनीता कांबळे व अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे यांनी स्थायी सभापतिपदासाठी अर्ज नेले आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अपक्ष नगरसेविका नसीम शेख व मनसेच्या वीणा बोज्जा यांनी अर्ज नेले आहेत. अर्ज नेले असले, तरी अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. अर्ज स्वीकृतीची मुदत सोमवारी दुपारी दोनपर्यंत आहे. सर्वच उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करतील. स्थायीच्या सभापतिपदासाठी मनसेचे डागवाले व राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका ठाणगे यांची नावे सुरुवातीपासून चर्चेत आहेत. दोघांनाही आमदार अरुण जगताप यांनी शब्द दिला आहे, परंतु काँग्रेसच्या नगरसेविका कांबळे यांनी अर्ज नेल्याने या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभेत या पदांची निवड होईल.
कोण बाजी मारणार ?
महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका रुपाली वारे यांचे नाव चर्चेत होते, परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका शेख यांनी उमेदवारी अर्ज नेला. त्यामुळे दोन्ही पदांसाठी ऐनवेळी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.