आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Murder Case Lifetime Punishment To Criminal

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- हातउसने दिलेले पैसे मागितल्याचा राग येऊन खून करणार्‍या आदिनाथ त्रिंबक वर्पे (30, राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश जयंत कुळकर्णी यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सहा महिन्यांची सक्तमजुरीही ठोठावण्यात आली.

रामभाऊ ज्ञानदेव डौले (नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल पल्लवीसमोर, राहुरी) यांचे व आरोपी वर्पे याच्याशी दहा वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. डौले यांनी आरोपीला तीन लाख रुपये हातउसने दिले होते. चारा वाहतुकीची रिक्षा चालवण्याचे काम आरोपी करायचा. काही दिवसांनंतर डौले व त्यांची पत्नी सारिका यांनी उसने पैसे परत मागितले. सहा महिने झाले, तरी पैसे परत मिळत नसल्याने 11 मे 2011 रोजी आरोपी घरी आल्यानंतर डौले दाम्पत्याने पैशांची मागणी केली. दुपारपर्यंत पैसे परत करतो असे सांगत तो निघून गेला. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सारिका घरात एकट्याच असताना आरोपी आला. त्याने सारिका यांच्यावर धारदार शस्त्राने पाच-सहा वार केले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने नंतर त्याच शस्त्राने स्वत:वर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राहुरी पोलिस ठाण्यात रामभाऊ डौले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. तपासानंतर दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले.

न्यायाधीश कुळकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. प्रत्यक्ष कामकाजाच्या चार दिवसांत हे प्रकरण निकालापर्यंत पोहोचले. दोन प्रत्यक्षदर्शी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी व तपासी अंमलदार उपनिरीक्षक आय. एन. पठाण यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेप व एक हजार रुपये दंड, तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली.