आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: अकार्यक्षमतेनंतरही पोलिसांचा हेरगिरीचा पराक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दंगलींचा इतिहास व महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेला गणेशोत्सव समजून घेण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे सोमवारी रात्री नेता सुभाष चौकात झालेल्या राड्यातून स्पष्ट झाले. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष पोलिस बंदोबस्त लावण्याची मागणी आमदार अनिल राठोड यांनी वीस दिवसांपूर्वीच केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विशेष म्हणजे मंगळवारी झालेल्या आमदार राठोड यांच्या पत्रकार परिषदेत पोलिसच हेरगिरी करत असल्याचे आढळले.


मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी गणेशोत्सव म्हणजे पर्वणी असते. उत्सवाचा गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी पोलिसांनी अधिक सजग राहणे अपेक्षित होते. शहराला असलेला दंगलीचा इतिहास लक्षात घेऊन गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी चोख बंदोबस्ताची गरज होती. मात्र, प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीतच ही अपेक्षा फोल ठरली. नेता सुभाष चौकात शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री तब्बल पंधरा मिनिटे फ्रीस्टाइल राडा झाला. यात सोडावॉटरच्या बाटल्या व दगडांचा मारा करण्यात आला. या प्रकारामुळे गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच अशांतता निर्माण झाली.

आमदार राठोड यांनी 21 ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन प्रतिष्ठापना मिरवणुकीत छाया टॉकीज ते नेता सुभाष चौकादरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. दिल्लीगेटचे सिद्धेश्वर तरुण मंडळ, अचानक तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप यांच्या मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे लावून विचित्र नाच केला जातो. हातात फलक घेऊन गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते हे कृत्य करतात. त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असून त्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त लावण्याची मागणी राठोड यांनी केली होती. गेल्यावर्षीही अशीच मागणी त्यांनी केली होती. ही मागणी विचारात घेऊन बंदोबस्त तैनात नसल्याने सोमवारी रात्री तणाव निर्माण झाला.

या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता राठोड यांनी पत्रकार परिषद बोलावली. पत्रकारांसमवेत दोन पोलिसही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेले प्रo्न व राठोड यांच्याकडून येणारी उत्तरे यांची नोंद ते करीत होते. आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांकडून हेरगिरी होत असल्याचे यातून पुढे आले. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना जाब विचारणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांनी मात्र यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल

सोमवारच्या फिर्याद देण्यासाठी आमदार राठोड तोफखाना पोलिस ठाण्यात गेले होते. त्यानंतर आमदार अरुण जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात थांबले होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजूंची फिर्याद घेणे टाळले. स्वत: फिर्यादी होत पोलिसांनी यासंदर्भात रात्री साडेअकरा वाजता दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस उपनिरीक्षक एस. एस. चित्तमपल्ले यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या गटातील सूरज सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, जगदीश (पूर्ण नाव माहिती नाही), संदीप जाधव, दिलदारसिंग बीर, गणेश हुच्चे व इतर 20 ते 30 जण, तर दुसर्‍या गटातील सचिन जाधव, मनोज सत्यनारायण चव्हाण, सागर काळे, संदीप अर्जुन दातरंगे, बंटी परदेशी व इतर 20 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप यातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भारतीय दंड विधान कलम 143, 147, 149, 323, 336, 504 नुसार, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. लाइटमाळ लावलेली लाकडी बल्ली हलवल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सोडावॉटर बाटल्या, दगडफेक व हाणामारीत सहाजण जखमी झाल्याचा उल्लेखही आहे. जखमीत चार पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक व्ही. एम. पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर पाऊणच्या सुमारास सचिन जाधव यांची फॉच्यरुनर गाडी (एमएच 16 एटी 01) गुलमोहोर रस्त्यावरील हॉटेल सायंतारामागे फोडण्यात आली. सूरज जाधव, अर्जन जज्जर, विशाल जज्जर यांनी सोडावॉटरच्या बाटल्या फेकून गाडीच्या मागच्या व डाव्या बाजूच्या काचा फोडल्याची फिर्याद सचिन जाधव यांनी तोफखाना पोलिसात दिली आहे.

घटनेची सखोल चौकशी करा: संग्राम जगताप

नेता सुभाष चौकात झालेल्या वादाला आमदार राठोड यांनी सुरूवात केली. त्यामुळे केवळ गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाही, तर सखोल चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादी तशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांची काठी हातात घेऊन मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करणे शहराच्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. शांतता ठेवणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते. परंतु राठोड उलट वागत आहेत. आमच्याही भागात शिवसेनेची गणेश मंडळे आहेत, मग केवळ नेता सुभाष चौकातच अशा घटना का घडतात, याचे सत्य पोलिसांनी जनतेसमोर मांडावे, जगताप म्हणाले.

शेलार म्हणाले, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राठोड यांचे पित्त खवळले आहे. मारहाण व शिवीगाळ करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते का दुरावले, याचे चिंतन त्यांनी करणे गरजेचे आहे. हातात काठी घेऊन मारहाण करणे, ही बाब लोकशाहीत बसत नाही. राठोड यांनी केवळ राजकीय हेतूनेच हा प्रकार केला.

तणावाची परिस्थिती निर्माण करून पुन्हा संरक्षण देत असल्याचा आव आणायचा, असा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, असे आवाहन शेलार यांनी केले. राठोड यांच्या चुकीच्या पध्दतीमुळेच कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले राठोड आणखी चुकीचे पावले टाकत असल्याचे शेलार म्हणाले. हा सेनेचा पूर्वनियोजित हल्ला होता. दगड, काठय़ा हातात घेणार्‍या शिवसेनेला जनता पुन्हा महापालिकेत बसू देणार नाही, असेही ते म्हणाले.

जशास तसे उत्तर : राठोड

जिल्हा पोलिस प्रशासन सक्षम असले पाहिजे, त्यांचा आदरयुक्त वचक समाजावर असला पाहिजे. असा वचक नसल्यानेच सोमवारी रात्रीचा प्रकार घडल्याचा आरोप आमदार राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही उपयोग झाला नसून यापुढे संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठरावीक मंडळांचे कार्यकर्ते दरवर्षी नेता सुभाष चौकात त्यांच्या नेत्याचे पोस्टर झळकावून घोषणाबाजी करतात. हे कार्यकर्ते त्या पक्षाचे आहेत की व्यक्तीचे हे माहिती नाही, असे सांगताना आमदार अरुण जगताप यांचे नाव घेण्याचे राठोड यांनी टाळले. दिवस खराब करायचा नसल्याने नाव घेण्याचे टाळत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. गणेशोत्सवात पक्षनेत्याच्या पोस्टरचे काय काम? असा सवाल उपस्थित करत गेल्या आठ-दहा वर्षांपासून ही बाब आपण प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहोत. मात्र, कारवाई होत नाही, असा आरोप राठोड यांनी केला. गणेशोत्सवापूर्वी गुंडांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. असे असतानाही गंभीर गुन्हे दाखल असलेले गुंड प्रवृत्तीचे काहीजण पोस्टर घेऊन पोलिसांसमोर नाचत होते. राजार्शय असणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिस पाठीशी घालतात, असा आरोप राठोड यांनी केला.

सोमवारी रात्री शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर झळकावून घोषणाबाजी सुरू केली. तरीही कार्यकर्त्यांनी संयम बाळगला. शिवमुद्राच्या कार्यकर्त्यांनी कहर करत लाइटिंगचा खांब उखडण्याचा प्रयत्न केला. जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता वाहनातून आणलेल्या सोडावॉटरच्या बाटल्या व दगड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर फेकण्यात आले. त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सीमित प्रतिक्रिया केली. आपण कार्यकर्त्यांना शांत केले; अन्यथा भडका उडाला असता, असे राठोड यांनी सांगितले.

गणपतीच्या नावाखाली गुंडांच्या टोळ्या शहरात फिरत असल्याचा आरोप करून राठोड यांनी कारवाईची मागणी केली. पोलिसांना जमणार नसेल, तर शिवसेना बंदोबस्त करण्यास सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला.