आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Political Issue, Ahmednagar Municipal Corporation

भाषणांतूनही शहर विकास गायब; जाहीरनामा जनतेसमोर नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीतील मतदानाचा दिवस अवघ्या दहा दिवसांवर आला, तरी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी शहर विकासाचा जाहीरनामा अजून जनतेसमोर मांडलेला नाही. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यात मात्र हे पक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे कोणता पक्ष शहर विकासाचे ‘व्हिजन’ घेऊन काम करणार याबाबत नगरकर अनभिज्ञ आहेत. मतदान करायचे तरी कुणाला असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
महापालिकेतील 68 जागांसाठी 15 डिसेंबरला मतदान होणार आहे. 370 उमेदवार रिंगणात उतरले असून प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. गल्लोगल्ली प्रचारफेºया काढून आम्हालाच निवडून द्या, असे साकडे उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांना घातले जात आहे. मात्र, नगरकरांची काय अपेक्षा आहे, याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
भाजप व शिवसेना युतीतील वाद अजून धुमसत असून एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत. नुकतीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची प्रचारसभा झाली. त्यात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल मंत्री बाळासाहेब, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्यासह आमदार व स्थानिक नेत्यांनी जोरदार भाषणे ठोकली. ‘शहराचा विकास करायचा’ या एका ओळीत विकासाचा विषय गुंडाळत सगळ्यांनी भाजप व शिवसेनेवर भरभरून टीका करण्याची संधी सोडली नाही.
खासदार दिलीप गांधी यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले. त्यात पालकमंत्र्यांच्या थकबाकीवर बोट ठेवण्यात आले, पण शहर विकासाचा मुद्दा गांधीकडूनही राहून गेला.
निवडणुकीत चुरस वाढली असली, तरी विकासाच्या विषयावर बोलण्यात कोणत्याही पक्षाला स्वारस्य नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा केंद्र व राज्य सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, अनंत देसाई, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप तयार करणार आहेत. नगरकर या जाहीरनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आरोप-प्रत्यारोपांतच रमले सर्व पक्षांचे नेते; जाहीरनामे गुलदस्त्यात
आणखी दोन दिवस...
निवडणुकीला अजून दहा दिवस आहेत. जाहीरनामा मांडायला विलंब झालेला नाही. दोन दिवसांत जाहीरनामा तयार होईल. हा एका पक्षाचा नाही, तर आघाडीचा संयुक्त जाहीरनामा असेल.’’
-विनायक देशमुख, काँग्रेस नेते.

निवड समितीचे काम सुरू
शहर विकासाचा जाहीरनामा आम्ही मांडणार आहोत. आमची निवड समिती जाहीरनामा तयार करणार आहे. त्यांचे काम सुरू असून लवकरच जाहीरनामा जनतेसमोर मांडू.’’
-संभाजी कदम, शहरप्रमुख, शिवसेना

विलंब झालेला नाही
जाहीरनाम्यात शहर विकासाचे मुद्दे मांडले जाणार आहेत. जाहीरनामा मांडायला विलंब झालेला नाही. त्यावर काम सुरू असून दोन दिवसांत तो प्रसिद्ध करण्यात येईल.’’
-संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

उमेदवारांचे वैयक्तिक जाहीरनामे
मतदानाचा दिवस जवळ आल्याने उमेदवारांनी वैयक्तिक जाहीरनामे तयार केले आहेत. त्यात प्रभागात पुढील पाच वर्षांत काय करणार याचा लेखा-जोखा मांडला आहे. सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहणाºया एकाही पक्षाला शहर विकासाचा जाहीरनामा तयार करायला वेळ मिळालेला नाही.