आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुविधांची ऐशीतैशी: आरक्षण हवंय? किमान तासभर थांबा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रेल्वेचं आरक्षण करायचंय? त्यासाठी किमान तासभर वेळ घालवण्याशिवाय पर्याय नाही, कारण आरक्षणासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था असताना एक खिडकी दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद असते. दुपारी गर्दी नसल्याचे कारण दाखवत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परिणामी या वेळेत आरक्षणासाठी किमान एक तास तरी वाया घालवण्याशिवाय प्रवाशांना तरणोपाय नसतो. आरक्षणाच्या गर्दीबरोबरच प्रवाशांना इतरही अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत असताना रेल्वे प्रशासन मात्र सोलापूरच्या विभागीय कार्यालयाकडे बोट दाखवत आहे.

एकतर चार महिने आधी आरक्षण करावे लागते. त्यामुळे ऑनलाइन आरक्षण करणे सोयीचे होत नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक आरक्षणासाठी स्टेशनवरच येतात. नगर रेल्वेस्टेशनवरून जाणार्‍या गाड्यांची संख्या वाढली आहे. परिणामी प्रवाशांची संख्याही वाढते आहे. अशावेळी सुविधांत वाढ करण्याऐवजी आहे त्या सुविधांत कपात करण्याचे रेल्वेचे धोरण आहे.

नगरच्या रेल्वेस्टेशनवर आरक्षणासाठी टोकन पद्धत आहे. आरक्षणाच्या अर्जावर चौकशीच्या खिडकीत एक शिक्का मारला जातो. त्यात आपला टोकन क्रमांक असतो. तो क्रमांक आल्यावर खिडकीजवळ जाऊन आरक्षण करायचे, अशी पद्धत आहे. मात्र, प्रवाशांना त्याची माहिती व्यवस्थित दिली जात नाही. त्यामुळे प्रवासी खिडकीसमोर रांग लावून उभे असतात. वास्तविक तेथे रेल्वेचा सुरक्षा कर्मचारी असायला हवा. तथापि, प्रवाशांना सर्व काही माहिती आहे, असे गृहीत धरून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या गैरसोयींत भर टाकत आहे.

चौकशी कोठे करायची?

प्रवाशाला कोणतीही माहिती हवी असल्यास रेल्वेची विश्वसनीय यंत्रणाच उपलब्ध नाही. स्टेशनवर चौकशीची खिडकी आहे, पण तेथे पूर्णवेळ कर्मचारी नसतो. असलाच तर तो ‘139’ क्रमांकावरून माहिती घ्या, असा सल्ला देतो! पूर्वी प्रत्येक स्टेशनवर चौकशीची यंत्रणा होती. अर्थात तेथील दूरध्वनी उचलला जात नसल्याच्या प्रचंड तक्रारी येत होत्या.

त्यानंतर रेल्वेने 139 क्रमांकावरून चौकशीची सेवा उपलब्ध करून दिली. या क्रमांकावरून आरक्षण निश्चित (कन्फर्म) झाले की नाही, हे पाहता येते. त्या मेनूपर्यंत जाण्यासाठी सूचनांचा भडिमार होतो. तो सहन करून पीएनआर क्रमांक डायल केल्यावर, ‘‘आपण दिलेली माहिती चुकीची आहे,’’ असे ऐकावे लागते. त्यामुळे हवी ती माहिती मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा डायल करावे लागते. याच क्रमांकावरून गाडीच्या आगमन-प्रस्थानाची माहिती मिळवण्याची सोय आहे. रेल्वे आणि नियोजित वेळेचे फारसे जमत नाही. त्यामुळे कोणती गाडी स्टेशनवर केव्हा येणार याची माहिती घेतल्याशिवाय तेथे जाणे गैरसोयीचे ठरते. माहिती न घेता स्टेशनवर जावे आणि गाडी दोन-तीन तास उशिरा यावी, असे नेहमी घडते.

गाडीच्या आगमन-प्रस्थानाची माहिती देण्याचे काम ‘139’ या क्रमांकावर होते. कोणती गाडी कोठे आहे, ती किती उशिराने धावत आहे याची अद्ययावत माहिती त्या गाडीच्या मार्गात येणार्‍या स्टेशनवरील अधिकार्‍यांनी सातत्याने पाठवणे आवश्यक असते, पण तसे घडत नाही. त्यामळे प्रवाशांना या क्रमांकावर मिळणारी माहिती, स्टेशनवर उद्घोषणा होत असतानाची माहिती व प्रत्यक्षात गाडी येण्याची वेळ यात मोठी तफावत असते. अनेकदा ‘139’ क्रमांकावरील माहितीवर अवलंबून राहिल्याने गाडी चुकल्याचे प्रवासी सांगतात.

रेल्वेस्टेशनबाहेर झोपडपट्टी वाढली आहे. रात्री अनेकदा या भागातील पथदिवे बंद असतात. पायी जाणार्‍या प्रवाशांचे त्यामुळे हाल होतात. या भागात सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्याची गरज आहे.

कर्मचार्‍यांचा उद्धटपणा नित्याचा
रेल्वेची सेवा अत्याधुनिक करण्याच्या घोषणा होत असताना नगरला मात्र प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर उद्धट उत्तरे ऐकावी लागतात. ज्यांच्या जिवावर रेल्वे चालते, त्या प्रवाशांशी रेल्वेचे कर्मचारी नम्रपणे कधी बोलणार?
-प्रशांत ठुबे, प्रवासी, नगर.

सावेडीत आरक्षण सुविधेसाठी प्रयत्न
सावेडीत व मुख्य टपाल कार्यालयात जागा उपलब्ध केल्यास तेथे रेल्वे आरक्षण व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही आरक्षण खिडक्या पूर्ण वेळ उघड्या ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचार्‍याची मागणी आम्ही केली आहे.
-संग्राम म्हस्के, सदस्य, रेल्वे विभागीय सल्लागार समिती.