आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभवनाचे भाग्य उजळले; नोव्हेंबरपूर्वी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सर्जेपुरा येथील रंगभवनच्या नूतनीकरणाला शुक्रवारी रंगकर्मींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या खुल्या नाट्यगृहाचे भाग्य उजळले. नोव्हेंबरपूर्वी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

रंगभवन पुन्हा सुरू करण्यासाठी शहरातील हौशी नाट्यकर्मींनी वेळोवेळी आंदोलने केली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. महापौर शीला शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी प्रस्ताव तयार केला. रंगभवनला नवी झळाळी देण्यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च येणार आहे. कामाच्या पहिल्या टप्प्यात 14 फुटांची संरक्षक भिंत व सुमारे 500 प्रेक्षकांना बसता येईल, अशी आसन व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार अनिल राठोड, महापौर शिंदे, नगरसेवक संभाजी कदम, अनिल शिंदे, शहर अभियंता कुलकर्णी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अनंत जोशी, पंडित रघुनाथ केसकर, सतीश लोटके, शशिकांत नजान, प्रसाद बेडेकर, नगरसेविका मालन ढोणे आदी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, पूर्वी नगरला मोठे खेडे म्हटले जायचे, पण आता ही ओळख पुसून शहर अद्ययावत होत आहे. केवळ रस्ते, वीज, पाणी याला विकास म्हणता येणार नाही. कारण या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. या गरजांबरोबरच चांगली कामे हाती घेऊन आम्ही शहराचा विकास करणार आहोत.

या रंगमंचावर पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांनी नाटकांचे प्रयोग केले आहेत. या स्मृती जपत नव्या कलावंतांनी नगरचा लौकिक आणखी वाढवावा. रंगमंचासाठी निधी कमी पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. रंगकर्मींनी या कामावर लक्ष ठेवावे. रंगकर्मी असल्याशिवाय जीवनात रंग येत नाही, असे राठोड म्हणाले.

महापौर शिंदे म्हणाल्या, महापौरपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरातील ऐतिहासिक वास्तुंची मी पाहणी केली होती. त्यावेळी या रंगभवनलाही भेट दिली. त्याचवेळी रंगभवनचे जुने वैभव परत मिळवून देण्याचे ठरवले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागला. आपण नेहमीच गटारे व नाल्यांची बांधकामे करतो, पण ही वास्तू उभी राहिल्यावर इथे काम करणारे कलावंत निश्चित नगरचे नाव राज्यात पुढे आणतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.


रंगभवनासमोरील पार्किंगचे काय?
रंगभवनच्या बाहेरील बाजूस व्यावसायिक गाळे आहेत. वाहनांच्या स्पेअर पार्टस्ची दुकाने व गॅरेजमुळे तेथे नेहमी वाहनांची गर्दी असते. रंगभवन सुरू झाल्यानंतर पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे नूतनीकरणाबरोबरच पार्किंग व्यवस्थेचाही विचार होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबरपूर्वी काम पूर्ण करणार
सर्वांची साथ मिळाल्याने नाट्यगृहाचे काम सुरू करता आले. त्यासाठी उपलब्ध असलेला 30 लाखांचा निधी कमी आहे. या नाट्यगृहाशी लोकांच्या भावना निगडित असून त्यांचे मोल करता येणार नाही. सर्व बांधकाम आरसीसीमध्ये करण्यात येणार आहे. व्हीआयपींसाठी स्वतंत्र गेट असेल. नोव्हेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’
-एन. डी. कुलकर्णी, शहर अभियंता.

मला तो सुवर्णकाळ पुन्हा अनुभवायचा आहे..
435 वर्षांपूर्वी रंगभवनाचा सुवर्णकाळ होता. या ठिकाणी अनेक नाटकांचे प्रयोग व एकांकिका झाल्या. भग्नावस्थेतील या नाट्यगृहाला उजिर्तावस्थेत आणण्यासाठीचे होत असलेले प्रयत्न पाहून आज आनंद होत आहे. माझे वय 82 आहे. लवकरात लवकर महापौरांनी हे काम पूर्ण करावे. कारण मला तो सुवर्णकाळ पुन्हा पहायचा आहे.’’
-पंडित रघुनाथ केसकर, ज्येष्ठ कलावंत.