आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर तालुक्यात दलबदलूंना महत्त्व!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यात दलबदलूंना महत्त्व आले आहे. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न मानणार्‍या या पतितांना आता राष्ट्रीय म्हणवून घेणारे पक्षही पावन करून घेण्याच्या तयारीत आहेत.
नगर तालुक्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाचे संदर्भ बदलले आहेत. गतवेळेस आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष व काँग्रेसने महायुती करत आव्हान दिले होते. त्यावेळेस या महायुतीस तालुक्यातील जनतेने भरघोस पाठिंबाही दिला होता. महायुतीने ती निवडणूक शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व खासदार दादा पाटील शेळके यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या युतीचे तालुक्यातील सहापैकी पाच जि. प. सदस्य व 9 पं. स. समिती सदस्य विजयी झाले होते. नंतरच्या काळात काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब हराळ व अरुण होळकर यांनी दादा पाटलांना सोडचिठ्ठी देत माजी खासदार बाळासाहेब विखे गटाचे बोट धरत तालुक्यात स्वतंत्र गट निर्माण करण्याचा प्रय} केला. शिवसेनेच्या पहिल्या सभापती नंदा शेंडगे यांनी आमदार शिवाजी कर्डिले गटात प्रवेश करीत राष्ट्रवादीची वाट धरली. नंतरच्या राजकीय घडामोडीत कर्डिलेच भाजपत आले. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांनी हराळ, होळकर, दत्ता नारळे, रंगनाथ निमसे, संजय गिरवले, बाबासाहेब गुंजाळ यांना बरोबर घेत कर्डिलेंचे नेतृत्व बाजार समितीसाठी स्वीकारले. जि. प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फुटीर गटाने पुन्हा दादा पाटलांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे घोषित केले.
मागील निवडणुकीत वाळकी गटात कर्डिले गटाकडून जिल्हा परिषदेत पराभूत झालेले दादा चितळकर मध्यंतरी भाजपबरोबर होते. आमदार विजय औटी यांच्याशीही त्यांनी जमवून घेतले आहे. आता ते कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत, हा प्रश्नच आहे. मात्र, ही निवडणूक ते राष्ट्रवादीकडून लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. कर्डिले यांचे सर्मथक व तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष बबन पडोळकर हे कोणती भूमिका घेणार हाही प्रश्न आहेच. निंबळक गटाचे सदस्य अरुण होळकर हे काँग्रेसकडून उमेदवारीच्या तयारीत असतानाच त्यांनी आपल्या सर्मथकांमार्फत शिवसेनेशीही संपर्क साधल्याची चर्चा होती. मात्र, सेनेकडे या गटात मीरा संजय जपकर यांच्या उमेदवारीचा पर्याय असल्याने त्यांनी होळकरांना आपलेसे केले नसल्याचे समजते. बाळासाहेब हराळ यांनीही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी कंबर कसलेली असतानाच ते कर्डिलेंशीही संपर्क साधून होते. कर्डिले यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी हराळ यांना कमळावर निवडणूक लढवण्याचा पर्याय सूचवला असल्याचे समजते.
अरणगाव गटात सेनेकडे उमेदवारी मागणारे सुनील उमाप हे काँग्रेसचे सर्मथक होते. भानुदास कोतकरांचे सर्मथक असलेले उमाप आता आपल्या पत्नीसाठी सेनेच्या दारात उभे राहिल्याचे दिसत आहे. केडगाव परिसरातील प्रभागात त्यांनी सेना उमेदवाराविरोधात पालिका निवडणुकीत आक्रमक प्रचार केला होता. अरणगाव गणात सेनेकडून संजय कार्ले यांनी उमेदवारी निश्चित असल्याने एकेकाळचे सेना सर्मथक मोहन गहिले यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
निंबळक गणात कर्डिले यांचे एकेकाळचे सर्मथक राजेंद्र शेवाळे आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळे किमान नगर तालुक्यात तरी पक्षनिष्ठा, नेतेनिष्ठा कंबरेला बांधून फिरणारी मंडळीच मोठय़ा प्रमाणावर दिसू लागली आहे. पक्ष, नेता यांच्याशी एकनिष्ठा दर्शवणार्‍यांना कायम सतरंज्या उचलण्याचेच काम वाट्याला येत असताना दिसते. बाजार समिती व त्यानंतर झालेल्या खरेदी-विक्री संघातही फुटिरांना पदांची खिरापत वाटण्यात आली. सत्तेचा सोपान चढून जाण्यासाठी प्रत्येक पक्षाची नेतेमंडळी विजय हाच एकमेव निकष लावू लागल्याने फुटिरांना महत्त्व प्राप्त होत आहे. इच्छुकांना पर्यायही मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दलबदलूंना महत्व झाले आहे.
पक्षनिष्ठ म्हणून सेनेबरोबर असणार्‍यांची संख्या मोठी आहे. नेतेनिष्ठ म्हणून कर्डिले व गाडे यांच्याबरोबर असणारेही बरेच आहेत. भाजप व काँग्रेस पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रमवारीत तिसरा, तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेला महत्त्व आले आहे. व्यक्तिनिष्ठाही थेट तालुक्याबाहेर बसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीची रणधुमाळी जशी वाढेल तसे लढतीचे व बंडखोरीचे चित्र स्पष्ट होत जाईल.