आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahmednagar Water Issue Madhikar Pichad Aggressive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी योजना लोकांसाठी की ठेकेदारांसाठी? मधुकर पिचड यांचा संतप्त सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे या योजनांवरील खर्च वाढतो आहे. पाणी योजना लोकांसाठी आहेत की ठेकेदारांसाठी, असा संतप्त सवाल पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पिचड बोलत होते. माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार चंद्रशेखर कदम, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. सागू यांनी निर्धारित वेळेवर पाणी योजना पूर्ण न झाल्याने योजनांवरील खर्च वाढल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता योजना ठेकेदारांसाठी आहेत की लोकांसाठी आहेत हेच मला कळत नाही, असे म्हणत पिचड यांनी पाणी योजनांबाबतची सुधारित माहिती आपल्याला द्यावी असा आदेश दिला.

पिचड म्हणाले, दुष्काळात राज्यात सर्वाधिक खर्च नगरवर करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने चारा डेपोंवर 94 कोटी, छावण्यांवर 288 कोटी 18 लाख, पाणी योजनांवर 47 कोटी, फळबाग अनुदानावर 293 कोटी, पीक विमा योजनेवर 91 कोटी 76 लाख, रोहयोवर 204 कोटी व कापसाच्या नुकसानभरपाईसाठी 58 कोटी असे 1 हजार कोटी 67 लाख रूपये खर्च केले आहेत. इतका मोठा खर्च झाला असताना त्या पैशांबाबत तुम्हाला, मला माहिती नाही.

प्रभारी पालकमंत्री म्हणून मला नेमा..
अधिकारी मुख्यालयात थांबत नाहीत, असे सांगून पिचड यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे पहात जिल्ह्यात कुठेही प्रभारी अधिकारी नेमू नका, कायमस्वरूपी अधिकार्‍यांची नियुक्ती करा, असे सांगितले. मी परवा ठाणे जिल्ह्यात गेलो होतो. तिथे सर्व अधिकारी प्रभारी होते. मी मुख्य सचिवांशी संपर्क साधला व त्यांना म्हणालो, प्रभारी पालकमंत्री म्हणून मला नेमा..

भाषणात वेळ घालवू नका..
सर्पदंश झालेल्यांना उपचार न मिळाल्याने पारनेर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला. याबाबतचा प्रश्न जि. प. सदस्य सुजित झावरे यांनी विचारला असता पिचड यांनी ‘‘मला वर्णन केलेले आवडत नाही, भाषणात वेळ घालवू नका,’’ असे सुनावले. जिल्हा आरोग्य अधिकारी कारभारी खरात यांनी सर्पदंशाच्या लसीचा पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर पिचड यांनी उपचारांअभावी लोक मरत असतील, तर हा 302 चा गुन्हा ठरतो. औषधे न पुरवणार्‍यांवर कारवाई करा असे खडसावले.

लोकसभा लढवणार नाही
दिंडोरी (जि. नाशिक) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार का, याबाबत पत्रकारांनी पिचड यांना विचारले असता मला पक्षाने भरभरून दिले आहे. मला आता कुठलीही अपेक्षा नाही. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठक अधिकार्‍यांचीच
पिचड सभागृहात येण्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव बैठकीत कुठल्या प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे, याबाबतची माहिती अधिकार्‍यांना देत होते. त्याच वेळी जि. प. सदस्य सुजित झावरे यांचे सभागृहात आगमन झाले.झावरे यांच्याकडे पाहत जाधव म्हणाले, ही बैठक अधिकार्‍यांची आहे. यावर झावरे यांनी ‘साहेबांना विचारून आत आलो’ असे सांगितले.