आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर जिल्हा परिषदेमधील ‘ई-प्रशासन’ रखडले; लाखो रुपयांचा खर्च गेला वाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- संपूर्ण जिल्हा परिषद संगणकाच्या माध्यमातून जोडण्यासाठी इमारतीत अत्याधुनिक ‘लॅन’ (लोकल एरिया नेटवर्क) बसवण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे ई-प्रशासन धोरण रखडले आहे. नव्याने लॅन बसवण्यात येत असल्याने यापूर्वी लॅनवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा माफक दरात जनतेला पुरवण्यासाठी सरकारने ई-धोरण राबवण्याचा निर्णय 23 सप्टेंबर 2011 मध्ये घेतला. त्यासाठी अत्याधुनिक लॅनची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेने शासनाच्या दरकरारानुसार ओरिएन्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई) संस्थेला संपूर्ण इमारतीत लॅन सुविधा बसवण्याचे काम दिले. वास्तविक जिल्हा परिषदेत 2006 मध्ये प्रत्येक विभागांतर्गत कॅट 5 केबलमार्फत लॅन बसवण्यात आले होते. परंतु या लॅनची वेळीच दुरुस्ती देखभाल न झाल्याने या लॅनचा काही विभागात बोजवारा उडाला आहे. नव्या धोरणानुसार अत्याधुनिक लॅन बसवल्यामुळे यापूर्वी या कामासाठी केलेला खर्च वाया जाणार आहे. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात अर्थ विभागाकडे विचारणा केली असता जुन्या लॅनची केबल (कॅट 5) कमी संगणकांनाच ही सुविधा पुरवण्यास सक्षम होती. परंतु त्यानंतर कार्यालयात संगणकांची संख्या 200 च्या घरात पोहोचल्याने अत्याधुनिक लॅन बसवण्यात येत आहे. यासाठी फायबर ऑप्टिकल केबल वापरण्यात येत आहे. मात्र, ही केबल जुन्या लॅनसाठी वापरलेल्या कॅट 5 केबलशी सुसंगत होणार नाही. म्हणून संपूर्ण कार्यालयात नव्याने लॅन बसवण्यात येईल, असे सांगितले. नव्याने लॅन बसवण्यासाठी संबंधित कंपनीला दिलेली मुदत संपली. कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने अर्थविभागाने वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु आजतागायत लॅन बसवता आले नाही. लॅनचे काम पूर्ण नसल्याने शासनाचे ई-धोरणही रखडले आहे.