आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर शिक्षण समितीच्या सभेत अधिकारी धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बायोमेट्रिक खरेदी, शिक्षकांच्या सोयीसाठी केलेल्या बदल्या व ई लर्निंग उपक्रमाबाबत शिक्षण समितीच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. नियमानुसार बदल्या न केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या चौकशीची मागणी सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेत उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य संभाजी दहातोंडे, परबत नाईकवाडी, सुरेखा राजेभोसले, नंदा भुसे, अँड. आझाद ठुबे, प्रवीण घुले, मीनाक्षी थोरात, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद आदी उपस्थित होते.

सभेत बदल्यांच्या विषयांवरून सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. बदल्या करताना जे शिक्षक बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत, त्यांना सोयीस्कररित्या नगर तालुक्यात नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे सीईओ अग्रवाल, भोर व गोविंद यांची चौकशी करावी, समितीचा ठराव घेऊन ग्रामविकास मंत्र्यांना पाठवावा, अशी मागणी सदस्य दहातोंडे यांनी केली. तसेच संगमनेर येथे बायोमेट्रिक खरेदी होऊन अद्यापि काही शाळात यंत्र बसवण्यात आले नाहीत. रेडिओवरून वुई लर्न इंग्लिश उपक्रम सुरू केला. पण जिल्ह्यात काही भागात तांत्रिक अडचणीमुळे लाभ घेता येत नाही. शिक्षकांना सोयीच्या बदल्या द्यायच्या होत्या, तर त्यांच्यासाठी फिरत्या मोबाइल शाळा सुरू करा, असा टोला सदस्य घुले यांनी लगावला. सर्वच सदस्यांकडून प्रश्नांचा भडिमार सुरू असल्याने अधिकारी निरुत्तरीत झाले. यावर राजळे यांनी चुकीच्या बाबी घडू नयेत याची दक्षता घ्यावी, असे आदेश अधिकार्‍यांना दिले.