आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्हा परिषद पतसंस्थेची सभा वादळी ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषद सर्व्हंट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने अहवाल पुस्तिकेत दाखवलेल्या इमारत व किरकोळ खर्चाबाबत विरोधी मंडळाने प्रश्न उपस्थित केला आहे. हा खर्च कशावर केला याचे स्पष्टीकरण घेणार असल्याचे विरोधी मंडळातील सभासदांचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्थेची रविवारी 7 जुलैला होणारी सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पतसंस्थेत दहा वर्षांपासून पावन गणेश पॅनेल सत्तेवर आहे. सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत धूसफूस सुरू असली तरी याबाबत गोपनियता पाळली जाते. संस्थेची सात जुलैला 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होत आहे. यासाठी संस्थेमार्फत अहवाल पुस्तिका पाठवण्यात आल्या आहेत. पुस्तिकेत दाखवलेल्या खर्चाबाबत परिवर्तन पॅनलचे महेश नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

नाईक म्हणाले, इमारतीसाठी तीन वर्षांत सुमारे 16 लाख रुपये खर्च केल्याचे दाखवले जाते. परंतु, हा खर्च कुठे केला याचे स्पष्टीकरण सत्ताधार्‍यांनी द्यावे. तसेच ऑफिस खर्च 1 लाख 20 हजार, स्टेशनरी खर्च 1 लाख 72 हजार, तर किरकोळ खर्च 1 लाख 47 हजार दाखवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त वीज, फोन व पेपरचे स्वतंत्र बिल दाखवण्यात आले आहे. या खर्चाचा ताळमेळ लागत नाही. अहवाल पुस्तिकेच्या शेवटच्या पॅनलवर आलेख दाखवण्यात आला, त्यात गणेश मंडळाची जाहिरात करण्यात आली आहे.

न्यायालयीन बाबीसाठी आतापर्यंत सुमारे 70 लाख खर्च झाल्याची माहिती समजते. पण पुस्तिकेत त्याचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेचे सायकल स्टँड चालवण्यासाठी भरलेली 25 हजार रुपयांची अनामत रक्कम परत घेतली नाही. याचा जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी सुसरे, दिलीप वडे, शिवाजी शिंदे, विशाल गणेश पॅनेलचे ए. वाय. नरोटे आदींनी दिली आहे.