आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या अडचणी कळवा ‘अहमदनगरवाला डॉट कॉम’वर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दैनंदिन जीवनात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी सोडवण्यासाठी नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी मंगळवारी ‘अहमदनगरवाला डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अडचणी सांगता येतील.

नागरी समस्या सोडवण्यासाठी सामान्य नागरिकाला महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा अधिकार्‍यांशी संपर्क होत नसल्याने काम होण्यास विलंब होतो. त्यासाठी अहमदनगरवाला डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. 1800-200-4020 या टोल फ्री क्रमांकावर समस्या सांगता येतील. त्यानंतर कार्यकर्ते या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करतील.

या संकेतस्थळाचे उद्घाटन मंगळवारी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, महिला व बालकल्याण सभापती मालन ढोणे, नगरसेवक दत्ता कावरे, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

गांधी म्हणाले, या संकेतस्थळामुळे नागरिक व अधिकार्‍यांमध्ये संवाद वाढेल. संकेतस्थळ सुरू करणे सोपे असले, तरी महापालिकेलाही समस्यांच्या सोडवणुकीसाठी अपडेट राहावे लागेल. हातात सुविधा आल्या की, त्याचा फायदाही होतो आणि तोटाही होतो. संकेतस्थळामुळे लोकांच्या अपेक्षा वाढतील.

महापौर म्हणाल्या, महापालिकेतील अधिकार्‍यांपर्यंत नागरिक पोहचू शकले नाही, तरी कार्यकर्ते जनतेच्या समस्या अधिकार्‍यांसमोर मांडतील. या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपनगरांत जास्तीत जास्त सुविधा पुरवणे शक्य होईल. नगरसेवकांना मिळणारा निधी कमी असतो. या निधीत सर्वच कामे होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे.

फक्त मिस कॉल द्या..
अतुल शिंगवी यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. 1800-200-4020 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर संकेतस्थळावरून पाच ते दहा मिनिटांत आपल्याला कॉल करण्यात येईल, असा मेसेज येतो. त्यानंतर आलेल्या कॉलवर आपली समस्या सांगावी.

केडगावकरांना लाभ
केडगाव उपनगरातील नागरिकांना या संकेतस्थळावर आपल्या नागरी समस्या मांडता येतील. नागरिकांच्या समस्या कमी वेळात सोडवण्याचा आमचा या उपक्रमामागील हेतू आहे.’’ शिवाजी लोंढे, नगरसेवक.