आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह: निवडणूक रिंगणात 70 टक्के ‘डागी’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वच्छ प्रतिमेचा निकष बासनात गुंडाळत सर्वच राजकीय पक्षांनी ‘डागी’ उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतील सुमारे 70 टक्के पुरुष उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दंगल, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांपासून राजकीय गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशांना उमेदवारी देण्यात शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, बसप यापैकी कोणताच पक्ष अपवाद नाही. काही दागी उमेदवारांना तर शिक्षाही झाली आहे.
राजकारणातील गुन्हेगारी कमी करण्याबाबत निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी सूचना व आदेश देते. सर्वोच्च न्यायालयाने याच वर्षी दिलेल्या एका आदेशानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीचे पद आपसूक रद्द होणार आहे. चाराघोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सभासदत्व रद्द करण्यात आले. यातून राजकीय पक्षांनी बोध घेण्याची आवश्यकता राष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे. उमेदवार देतानाच राजकीय पक्षांनी काळजी घेण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडून आलेल्या उमेदवारांनाही हा आदेश लागू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील उमेदवार ठरवताना सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या स्वच्छ प्रतिमेचा विचार करणे अपेक्षित होते. मात्र, निकष गुंडाळून उमेदवारांची निवड करण्यात आली. पुरुष उमेदवारांपैकी सत्तर टक्के व्यक्तींवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील काहींना शिक्षाही ठोठावण्यात आली असून खंडपीठातील त्यांची अपिले प्रलंबित आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अपक्ष व बंडखोरांचा भरणाही मोठय़ा प्रमाणात आहे. उमेदवारी जाहीर होताच राजकीय राड्यांना झालेली सुरुवात ही निकष डावलण्याचेच द्योतक ठरले. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले र्शीपाद छिंदम यांच्यावर तर प्रशासनाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली. खंडपीठात त्यांना दिलासा मिळाला असला, तरी पक्षाच्या प्रतिमेला या कारवाईमुळे तडा गेला. शिवसेनेला चकवा देत राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आलेले बाळासाहेब बोराटे यांच्यावरही विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी लादलेल्या या उमेदवारांबाबत शेवटी मतदारांनाच निर्णय घ्यायचा आहे.
निकष महत्त्वाचे
दाखल गुन्हे कोणत्या स्वरुपाचे आहेत यालाही महत्त्व आहे. उमेदवार निवडताना त्यांची शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमी तपासणे आवश्यक आहे. ज्या भागातून तो निवडणूक लढवत आहे, त्या भागातील प्रo्नांची त्याला जाण आहे का, याचीही पडताळणी पक्षांनी करायला हवी. उमेदवार निवडताना पक्षांनी लावलेल्या निकषांचाही मतदारांनी विचार करायला हवा.
- डॉ. शरद कोलते, सरसंचालक, आयएमएस, अहमदनगर.

महिलांमुळे घटली संख्या
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. 34 हक्कांच्या राखीव जागांबरोबर दोन ठिकाणी महिला पुरुषांशी लढत देत आहेत. महिला उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत नगण्य आहे. महिलांच्या वाढलेल्या जागांमुळे गुन्हे दाखल असणार्‍या रिंगणातील एकूण उमेदवारांच्या संख्येतील टक्केवारीत यावेळी घट झाली आहे.