आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरवर पाणीकपातीचे संकट; पाण्याची उधळपट्टी थांबवण्याचे महापौरांचे आवाहन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सुमारे पाचशे गावे व दोन हजार वाड्या-वस्त्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवसभर टँकरची प्रतीक्षा करावी लागते, तर दुसरीकडे नगर शहरात रोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ही उधळपट्टी थांबली नाही, तर आठवडाभरातच शहरावर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता आहे.

या उन्हाळ्यात नगरकरांना अजून खर्‍या अर्थाने पाणीटंचाईची जाणीव झालेली नाही. शहरात रोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे वास्तव ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी समोर आणले. त्यामुळे आता महापौर शीला शिंदे यांच्यासह मनपा प्रशासनानेही नगरकरांना पाणी बचतीसाठी आवाहन केले आहे.

साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या नगरला सध्या मुळा धरणातून दररोज 65 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या धरणात 6 हजार 700 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असला, तरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी 1 हजार 752 फुटांपर्यंत आवश्यक आहे. सध्या ही पातळी 1 हजार 762 फुटांपर्यंत खाली आली आहे. नागापूर एमआयडीसीलाही रोज सुमारे 32 एमएलटी पाणी लागते. त्यातच ग्रामीण भागातील बंधारे भरण्यासाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. शहरासाठी धरणात पुरेसा साठा असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले असले, तरी धरणातील पातळी कमी झाल्यास शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे मनपाला शक्य होणार नाही.

जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, र्शीगोंदे, पारनेर, कर्जत, जामखेड आदी तालुक्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी अनेक मैल पायपीट करावी लागते. शहराची परिस्थिती मात्र उलट आहे. मध्यवर्ती शहराला आठवड्यातून पाच दिवस, सावेडी उपनगराला दिवसाड, तर केडगावला तीन दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रत्येक भागात एक ते दीड तास पाणी सोडण्यात येते. पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी रस्त्यावर वाहत असते.

शहरात अधिकृत 46 हजार, तर अनधिकृत 30 हजार नळजोड आहेत. निम्म्यापेक्षा अधिक नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे वाया जाणार्‍या पाण्याचा कोणताही हिशेब महापालिकेकडे नाही. गळतीचे 20 ते 25 टक्के प्रमाण अनेक वर्षांपासून कायम आहे. सध्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेला चार दशके झाल्याने ती खिळखिळी झाली आहे.

मध्यवर्ती शहर व सावेडीत उधळपट्टी
मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगराला इतर भागांच्या तुलनेत अधिक पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागात पाण्याच्या उधळपट्टीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. सावेडीत अनेक नव्या वसाहती उभ्या राहत आहेत. त्यांच्या बांधकामासाठी लाखो लिटर पाणी वापरण्यात येते. दिवसाड पाणी मिळत असल्याने सावेडीकरांना पाणीटंचाईची जाणीव झालेली नाही. नळाला पाणी येताच घरातील ‘शिळे’ पाणी चक्क रस्त्यावर टाकले जाते. त्यामुळे अनेक भागातील रस्ते ऐन पाणीटंचाईच्या काळात पावसाळ्याप्रमाणे न्हाऊन निघतात.

नळांना तोट्या बसवा
नागरिकांनी नळांना तोट्या बसवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाते. तोट्या बसवण्यासाठी मनपाने वेळोवेळी आवाहन केले, पण त्याचा उपयोग झालेला नाही. सध्या सगळीकडेच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे आता तरी नळांना तोट्या बसवून घेणे आवश्यक आहे, नागरिकांनी उरलेले शिळे पाणी फेकून न देता ते वापरात आणावे.’’
-परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख.

>मुळा धरणातील पाणीसाठा - 6 हजार 700 दशलक्ष घनफूट
> शहराला रोज होतो सुमारे 65 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा
> एमआयडीसीला रोज 32 एमएलटी पाणी
> शहरात अधिकृत 45 हजार, तर अनधिकृत सुमारे 30 हजार नळजोड
> जिल्ह्यात 417 गावे व 1707 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा
> प्रशासनाचा 555 टँकरवर रोज लाखो रुपये खर्च


पाणी बचत ही काळाची गरज
जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर झाला असला, तरी मनपातर्फे नगरकरांना पुरेसे पाणी देण्यात येत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट येणार नाही. मात्र, नागरिकांनी पाण्याचे महत्त्व व सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याची बचत करण्याची गरज आहे.’’
-शीला शिंदे, महापौर.