आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्सग्रस्तांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एचआयव्ही, एड्सग्रस्तांसाठी सुसज्ज मल्टिस्पेशालिटी, तसेच सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त केअरिंग फ्रेंडस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन सोमवारी (२१ सप्टेंबर) होत आहे.
स्नेहालयाच्या एमआयडीसीतील पुनर्वसन संकुलात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला व्हरगो फाउंडेशनचे संस्थापक व्ही. एस. मणी, सिजेंटा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश आपटे, पुण्यातील प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कुलकर्णी, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे मुख्य व्यवस्थापक सजल कुलकर्णी, पद्मश्री विखे पाटील रूग्णालयाचे प्रमुख समन्वयक डॉ. अभिजित दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बावीस वर्षांपूर्वी एचआयव्हीग्रस्तांना वैद्यकीय सेवा, पुनर्वसन, समुपदेशन आदी सुविधा नि:शुल्क देणारा उपक्रम देशात सर्वप्रथम नगर येथील स्नेहालय संस्थेने सुरु केला. बांबूच्या चटया पत्र्याच्या टपरीत सुरु झालेला हा उपक्रम सन २००५ मध्ये २५ खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात स्थलांतरित झाला. वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना मिळवून देताना खासगी डॉक्टर शासकीय रुग्णालयांचीही मदत स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली.

नगरच्या डॉ. मार्सिया वॉरन, डॉ. शेहनाज आयुब, डॉ. हेमंत प्रिती देशपांडे, डॉ. मोहन थोलार, डॉ. हेमंत नाईक, डॉ. रेणुका अभिजित पाठक, डॉ. स्नेहल अमित कुलकर्णी, डॉ. धनंजय वाघ, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. जयदीप देशमुख यांच्यासह लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानचे या सेवेसाठी विशेष योगदान मिळाले. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने २०१२ मध्ये देशातील एड्सग्रस्तांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या समुदाय काळजी केंद्रांची मदत थांबवली, पण एड्सग्रस्तांची परवड लक्षात घेता स्नेहालयाने आपली रुग्णसेवा सुरुच ठेवली. तथापि, अचानक रुग्णांचा ओघ वाढल्यामुळे नवीन ५० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्याचे नियोजन स्नेहालयाला करावे लागले. रुग्णालयाचा आराखडा आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी निशु:ल्क करुन दिला. भूमिपूजन समारंभास सेवाभावी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न
रुग्णांनादीर्घकालीन पुनर्वसनासाठी हिंमतग्राम प्रकल्पात विनामूल्य प्रवेश दिला जातो. एड्सग्रस्त बेवारस अनाथ असल्यास मोफत, तर इतरांना माफत शुल्कात दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न या रुग्णालयाद्वारे केला जाईल. स्थानिक डॉक्टर रुग्णालयांची मदत मिळवून दिली जाणार आहे, असे या उपक्रमाचे संचालक डॉ. सुहास घुले, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश परजणे, डॉ. सचिन लांडगे, भरत कुलकर्णी, समन्वयक प्रवीण मुत्याल, विष्णू कांबळे, रेणुका दहातोंडे यांनी सांगितले.