आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधकारावर मात करून तिने शोधला "सुवर्ण'मार्ग, नव्या जीवनाला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; पतीएड्सने मरण पावल्यानंतर तिच्या आयुष्यात अंधार दाटला होता. त्यातच ती स्वत: एचआयव्हीग्रस्त असल्याचं निदान झालं. पण तिनं हाय खाता परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली. "सुवर्ण'मार्ग गवसलेली ही महिला आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

शेवगाव तालुक्यातील सुवर्णाला (नाव बदललेले) दोन मुलं. संसार सुखात सुरू असताना पतीला एड्सची लागण झाली.
काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. सुवर्णाही एचआयव्हीग्रस्त असल्याचं आढळून आलं. पुढं सगळा अंधार दिसत होता. अशातच तिला स्नेहालयाची माहिती मिळाली. या संस्थेत एचआयव्हीग्रस्तांवर उपचार केले जातात, हे कळल्यावर ती प्रकल्पात दाखल झाली. उपचार सुरू होताच सुवर्णाला बरं वाटू लागलं. थोडं शिवणकाम येत असल्यानं तिने त्याचं रितसर प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं. तिचं शिक्षण सहावीपर्यंतच झालं होतं. पुढे शिकण्याची इच्छा दाखवताच स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी तिला मुक्त विद्यापीठाचा पर्याय सूचवला. सुवर्णाने अभ्यास करून बीए पूर्ण केले.

काही दिवस केअर टेकर म्हणून काम केल्यानंतर सुवर्णानं ट्रेनिंग सेंटरची जबाबदारी स्वीकारली. मुली महिलांना ती शिवणकाम शिकवते. बॅगा, जॅकेट, पर्स या मुली तयार करतात. टेराकोटाच्या वस्तूही ट्रेनिंग सेंटरमध्ये तयार होऊ लागल्या. गणेशोत्सवात ६०-७० हजारांच्या शाडूच्या मूर्ती स्नेहालयातील मुलांनी तयार करून विकल्या. स्नेहालयाच्या प्रशिक्षण केंद्रामुळे अनेक महिलांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे.

धीर सोडू नका...
एचआयव्ही,एड्स झाला म्हणून घाबरू नका, धीर सोडू नका... एड्स झाला की सगळं संपलं असं नाही. उपचार व्यवस्थित घेतले, तर सर्वसामान्यांसारखंच तुम्हीही जगू शकता, असं सुवर्णा स्नेहालयात नव्याने दाखल झालेल्यांना सांगत जगण्याची उभारी देते. मागील पाच वर्षांपासून स्नेहालयात असलेल्या सुवर्णानं पुढील आयुष्यही संस्थेसाठी वाहून घेण्याचं ठरवलं आहे...