नगर - आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या व आमदार अशोक काळे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आलेल्या राज्यातील मंत्र्यांना नगर जिल्ह्यातील टंचाईची आठवण झाली. त्यांनी अनेक बैठकांचे नाटक पार पाडले. जून महिना पावसाविना गेल्याने चिंताक्रांत झालेल्या शेतकरी व पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यातील एकाही मंत्र्याला जिल्ह्यात येऊन अधिका-यांची साधी बैठक घेण्याची इच्छा झाली नाही.
लग्नाचे निमित्त साधून आलेल्या शहरात पायधूळ झटकणा-या या मंत्र्यांनी अनेक बैठका व पत्रकार परिषदा घेऊन आपण टंचाईबाबत किती गंभीर आहोत, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या मंत्र्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री मधुकर पिचड यांचा समावेश होता. अचानक या मंत्र्यांनी नगरवर टाकलेल्या ‘धाडी’मुळे त्यांच्यामागे धावाधाव करताना प्रशासकीय अधिका-यांची चांगलीच दमछाक झाली. बंदोबस्तासाठी पोलिसांवरही अतिरिक्त ताण आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पवार म्हणाले, ज्या पाणी पुरवठा योजनांची वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आली आहेत, त्या योजनांचे चालू बिल भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. ते पुढे म्हणाले, टंचाई स्थितीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. जनतेला पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धरणांतील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असून, त्यांच्या अधिकाराची मुदत 31 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जनावरांची संख्या विचारत घेऊन टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात.
जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले, जिल्ह्यातील 250 गावे व 1153 वाड्या-वस्त्यांना 317 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची 739 कामे सुरू असून, त्यावर 5668 मजूर काम करत आहेत. 248 गावांमधील पाण्याच्या स्रोतांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याबाबत आमदार अनिल राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पिचड यांची भेट घेऊन चर्चा केली. नगर शहरातून होणा-या अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, या प्रश्नाचे सरकारला गांभीर्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणखी कितीजणांचे बळी घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला.
दबाव आणला, तरी पाणी सोडू नका
धरणातील पाणी सोडण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. कितीही दबाव आला, तरी जलसंपदाच्या अधिका-यांनी पाणी सोडू नये, असे पवार यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर चारा पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा व शासकीय रुग्णालये यांना वीजबिल माफ करावे, अशी मागणी पुढे आली होती. त्यांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
उड्डाणपुलाबाबत सोमवारी बैठक
- नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल, तसेच बाह्यवळण रस्त्याबाबत सोमवारी (7 जुलै) मुंबईत बैठक होणार आहे. तेराव्या वित्त आयोगातून या कामांसाठी 14 कोटी देण्यात येतील. नगरला मुळा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तेथील एक्स्प्रेस फीडरला अखंड वीजपुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कुकडीच्या आवर्तनाबाबत नाशिक व पुणे विभागीय आयुक्त समन्वयाने निर्णय घेतील.’’ अजित पवार, उपमुख्यमंत्री.
फोटो - उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठक झाली. छाया : कल्पक हतवळणे