आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर कारखान्यासाठी अजित पवारांची फिल्डिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - 75 कोटींच्या थकीत कर्जामुळे राज्य सहकारी बँकेने नगर तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीस काढला आहे. त्यासाठी 15 जुलैपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असल्याचे समजते.

नगर कारखान्याने सन 2002 पासून गळीत हंगामाला सुरुवात केली होती. त्यासाठी 17 हजार 642 सभासदांकडून 4 कोटी 94 लाखांचे भाग भांडवल उभे करण्यात आले. कारखान्यासाठी सुरुवातीला सुमारे 34 कोटी रुपये 5-6 बँकांकडून कर्जरूपाने घेण्यात आले.

प्रतिदिन 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला नगर तालुका कारखाना एकाही हंगामात पूर्ण क्षमतेने गाळप पूर्ण करू शकला नाही. 2 ते 3 हंगामांत तो उसाअभावी बंदच राहिला. एकाही हंगामात सरासरी गाळप पूर्ण न करू शकल्याने कर्जाचे हप्ते फेडणे कारखाना प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत जाऊन तब्बल 75 कोटींपर्यंत गेली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना अवसायनात काढण्यात आला. वारंवार कर्जबाकीच्या नोटिसा पाठवून कारखाना व्यवस्थापनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज्य सहकारी बँकेने हा कारखाना विक्रीस काढण्याचा निर्णय घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

नगर तालुका साखर कारखान्याकडे स्वत:च्या मालकीची 237 एकर जमीन आहे. अत्याधुनिक व अत्यंत कमी वापर झालेली मशिनरी, गोडावून, इतर इमारती अशी मोठी मालमत्ताही कारखान्याकडे आहे. राज्य सहकारी बँकेने या सर्वांची किंमत 70 कोटी 59 लाख ठरवली आहे. हा कारखाना विकत घेण्यास इच्छुक असलेल्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

हा कारखाना विकत घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार इच्छुक असल्याची चर्चा आहे. कारखाना विकत घेण्यासाठी दौंड शुगर लिमिटेडतर्फे एक व त्यांच्याच पुण्यातील दोन कंपन्यांमार्फत निविदा दाखल केल्या जाणार असल्याचे समजते.

पवारांच्या या निर्णयामुळे नगर दक्षिण जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आजतागायत हा कारखाना माजी खासदार दादापाटील शेळके यांच्या ताब्यात होता.

जिल्ह्यात राजकीय बळ वाढवण्यासाठी होत आहे व्यूहरचना
उपमुख्यमंत्री पवार यांनी यापूर्वी कर्जतचा जगदंबा कारखाना विकत घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांत कर्जतमधून राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. आता नगर कारखाना विकत घेत र्शीगोंदे, पारनेर, राहुरी व नगर शहर विधानसभा मतदारसंघावर अंकुश ठेवण्याचा पवार यांचा विचार आहे. हा कारखाना ताब्यात आल्यास अनेक नेत्यांच्या मुसक्या आवळण्यासह काहींना लगाम घालणे शक्य होणार आहे. नगर दक्षिणच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. या सर्वच बाबी नगर कारखान्यामुळे शक्य होणार असल्याने हा कारखाना विकत घेण्यासाठी पवार इच्छुक असल्याचे समजते.