आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांचे चित्त ‘पायतणा’कडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘देव देवळात अन् चित्त पायतणात’ या म्हणीचा प्रत्यय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृतीतून सध्या येत आहे. सभेच्या व्यासपीठावर पोहोचताच ते गादीचा कोपरा स्वत: वर करून आपली चप्पल त्याखाली सरकावतात. चप्पलचोरांवर मात करण्यासाठी पवार यांनी ही नामी युक्ती शोधली आहे.

आघाडीच्या प्रचारासाठी पवार यांनी राज्यभर अनेक दौरे केले. मोदी लाटेचा परिणाम व प्रतिष्ठेची केलेली निवडणूक यामुळे पवार कुटुंबीय मतदारांना साद घालण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ मनमाड रस्त्यावरील संजोग लॉनवर फोडण्यात आला. मात्र या कार्यक्रमात त्यांची चप्पल चोरीला गेली. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही. तेव्हापासून या चप्पल चोरांचा धसकाच अजितदादांनी घेतलेला दिसतो. कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आजवर त्यांनी तीनदा नगर जिल्ह्याचा दौरा केला. प्रत्येक वेळी त्यांनी स्वत:च्या चपलेची काळजी घेतली.

व्यासपीठावर येताच ते कोपर्‍यातील गादीचा कोना उचलतात आणि चप्पल त्याखाली सरकवतात. त्यानंतर उपस्थितांना अभिवादन करत स्थानापन्न होतात. त्यांची ही सवय आता प्रमुख पदाधिकार्‍यांच्याही सवयीची झाली आहे. काही ठिकाणी मात्र पदाधिकारी दादांच्या ‘सतर्कते’ची दबक्या आवाजात चर्चा करतात.