नगर - जिल्ह्यात राजीव राजळे यांच्यापेक्षा अधिक ताकदवान उमेदवार आहेत. त्यांनीही तिकिटाची मागणी केली होती. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राजळेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. खासदारांशी संबंधित प्रश्नावरच ते भूमिका घेतील. स्थानिक दैनंदिन कामकाजात ते हस्तक्षेप करणार नाहीत, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना रविवारी दिला.
हुंडेकरी लॉन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बबनराव पाचपुते, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, अरुण जगताप, भाऊसाहेब कांबळे, डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार अप्पासाहेब राजळे, नरेंद्र घुले, दादा कळमकर, भानुदास मुरकुटे, दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, महापौर संग्राम जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गज्रे, निरीक्षक अंकुश काकडे, अरुण कडू आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राजळे यांची स्वच्छ प्रतिमा लक्षात घेऊन त्यांचे नाव अंतिम केले. राजळे हे केंद्राच्या पातळीवरील प्रश्नांत लक्ष घालतील. विधानसभा पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आहेत. कोणत्याही विधानसभा क्षेत्रात, तसेच स्थानिक पातळीवरील दैनंदिन कामकाजात राजळे
लुडबुड करणार नाहीत.
राजळे यांचा स्वभाव तापट आहे, असे सांगितले जाते. मी राजळे यांच्या पुढचा आहे. कामे करणार्यांना लोक मते देतात. माझ्याइतके मताधिक्य घेऊन निवडून येणारा नगर जिल्ह्यात एकही आमदार नाही. पक्षाने पक्षाचे काम केले आहे. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. एकजुटीने लढल्यास सहज जिंकू शकतो, हा इतिहास आहे. दोघांमध्ये थोडे अंतर पडले की फटका बसतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडीचे लोकच पाडू शकतात. इतरांची ताकद नाही. गेल्या निवडणुकीत हाच प्रकार घडला. या वेळी सावध राहत मोठय़ा मताधिक्याने राजळे यांना निवडून आणा, असे आवाहन पवार यांनी केले. राजळे यांच्या प्रचाराचा नारळही या वेळी फोडण्यात आला.