आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Election, Nationalist Congress Party, Divya Marathi

विरोधकांचे बुजगावणे झाले, अजित पवार यांनी साधले विरोधकांवर शरसंधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक ठिकठिकाणी कधी हातात चाबूक, तर कधी काठी, तसेच खांद्यावर घोंगडे घेत आहेत. पण चाबकाला वादी कुठे असते याचीही त्यांना माहिती नाही. बुजगावण्याच्या वेशातील हे विरोधक चुकीचे व बेताल आरोप करत आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी विरोधकांवर शरसंधान साधले.
नगर येथे झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड आदी उपस्थित होते.


पवार म्हणाले, 1995 च्या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी शरद पवार यांच्यावर वाट्टेल ते आरोप करत सत्ता घेतली. खोटे पण रेटून बोलण्याची हीच पद्धत या निवडणुकीतही विरोधकांकडून अवलंबण्यात येत आहे. विरोधकांच्या सभांमध्ये निवडक पाच नेते व्यासपीठावर येतात. कधी घोंगडी, कधी काठी, तर कधी चाबूक हातात घेऊन बेताल आरोप करू लागतात. घोंगडी, काठी, चाबूक यापूर्वी कधी आयुष्यात वापरला नसल्याने त्यांचे बुजगावणे होत आहे. कधी बैलगाडी तरी हाकलली आहे का? असा सवाल त्यांनी केला.


मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेना नेतृत्वानेच विरोध केला होता, याची आठवण करून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर शिवसेना नेते कधी फिरकले का, असा प्रश्नही पवार यांनी केला.


चुकलं की आम्ही दुसर्‍या दिवशी माफी मागतो. हा गुण विरोधकांमध्ये नाही. बारामतीत सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता बहीण-भावात वर्चस्वासाठी संघर्ष होणार, अशी आवई उठवण्यात आली. आमच्या चुलत्याने चांगली शिकवण दिली आहे. त्यांच्यात भाऊबंदकी आहे म्हणून आमचेही तसेच होईल, असा भ्रम पसरवण्यात आला. आमचे व्यवस्थित सुरू आहे, असे सांगण्यास पवार विसरले नाहीत.


हे वागणे बरे नव्हे..
सिंचन क्षेत्रात घोटाळा झाल्याची ओरड विरोधकांनी केली. मी तातडीने राजीनामा दिला. सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे परत मंत्रिपदावर आलो. विरोधकांच्या मागणीनुसार एसआयटी नेमली. त्यांनीच सुचवलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या अहवालातूनही काही निष्पन्न झाले नाही. मनासारखे झाले नाही की ओरड करण्याची विरोधकांची सवय आहे. आता एसआयटीच बरोबर नाही, असे ते म्हणतात. विरोधकांचे हे वागणे बरे नव्हे, असा टोला पवार यांनी लगावला.