आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Nationalist Congress, Sharad Pawar,Divya Marathi

दगाफटका केला, तर पक्षातून हकालपट्टी; अजित पवार यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे नसून स्वत: शरद पवार आहेत, असे समजून नेत्यांनी गटतट बाजूला ठेवून काम करावे. पक्षाशी दगाफटका केला, तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करू व त्यांच्या चार पिढय़ांना आठवतील असे त्यांचे काम करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिला.


राजळे यांच्या प्रचारार्थ निघोज येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना कामाला लागण्याचा संदेश त्यांनी देताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. व्यासपीठावर अंकुश काकडे, घनश्याम शेलार, दादा कळमकर, गुलाबराव शेळके, अशोक सावंत, सुजित झावरे, अँड.उदय शेळके, काशीनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे, शिवाजी सालके, सरपंच संदीप वराळ, सुवर्णा धाडगे आदी होते.


या निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे पाहून घेण्याचा इशारा पवार यांनी दिला. याबाबत आपण गंभीर असून पक्षाशी दगाफटका केला, तर शरद पवार माफ करतील, पण मी माफ क रणार नाही असे सांगून पक्षातील गट-तट व भांडणे या निवडणुकीत थांबवा, असे त्यांनी सांगितले. पक्षाशी गद्दारी करणार्‍यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा त्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्राचे औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद सुजित झावरे व इतर नेत्यांच्या शिफारशींवरूनच दिले आहे. परंतु मंत्रिपद दिले म्हणून रुसवा फुगवा न करता हे पद मलाही चालले असते, यावरून आता वाद घालू नका, असे पवार म्हणाले.


गुजरातचा डंका पेटवून हुकूमशाही प्रवृत्तीचा माणूस या देशाचा पंतप्रधान बनू पाहतो आहे. हे देशाला घातक आहे. राष्ट्रवादीने डॉक्टर, इंजिनिअर, वकील असे उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची अवस्था काय झाली, हे दिसते आहे. मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठांचा अपमान शिवसेनेत केला जातो. राणे, भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेना का सोडली याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला पवार यांनी दिला.


राळेगणचे सरपंच व्यासपीठावर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रक काढून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राळेगणसिद्धीचे सरंपच जयसिंग मापारी यांनी मात्र रविवारी निघोज येथील अजित पवार यांच्या सभेला हजेरी लावत पाठिंबा दर्शवला. पारनेरच्या काँग्रेस नेत्यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली.