आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत - दुष्काळाचा धैर्याने सामना करा, सरकार तुमच्या पाठीशी आहे. भविष्यात अशी दुष्काळी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. विरोधक आमच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. यापेक्षा ते वेगळे काहीच करीत नाही. छावण्यांतील जनावरांच्या अनुदानामध्ये 1 मे पासून वाढ करण्यात आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या आढावा दौर्यादरम्यान त्यांनी चिंचोली काळदात येथील जनावरांच्या छावणीस भेट दिली. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकर्यांच्या छावणी, रोजगार हमी योजनांच्या कामासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, विक्रमसिंह पाचपुते, राजेंद्र फाळके, आमदार सुरेश धस, सिद्धार्थ मुरकुटे, डॉ. राजेश तोरडमल, सभापती सोनाली बोराटे, नितीन धांडे, काका तापकीर, प्रांताधिकारी संदीप कोकडे यांच्यासह तहसीलदार जयसिंग भैसडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते रघुनाथ काळदाते यांनी छावणीचालकांच्या समस्यांबरोबरच तुकाईचारी व वाढत्या दरोड्यांविषयी प्रश्न उपस्थित केला. यासाठी मुंबईला खास बैठक घेऊन यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. प्रा. बाळासाहेब सपकाळ यांनी आजारी जनावरांच्या संदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली. यासंदर्भात तत्काळ निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.