आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Positve With Congress In Aurangabad, Navi Mumbai Civic Polls

औरंगाबाद मनपासाठी काँग्रेसशी आघाडी करू, अजित पवारांचे शिर्डीत संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - औरंगाबाद नवी मुंबईसह इतर सर्वच ठिकाणी होणार्‍या निवडणुकीतील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची राष्ट्रवादीची प्रथमपासून भूमिका आहे. याबाबत मंगळवार किंवा बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ९४व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार बोलत होते. शिवसेनेचे माजी आमदार अशोक काळे यांनी या वेळी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. महानगर पालिकांच्या निवडणुकीतही काँग्रेसशी युती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी सिंधुताई विखे पाटील, अशोक काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, चंद्रशेखर कदम, आशुतोष काळे, चैताली काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात पवार यांनी राज्य केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. आज राज्यातील साखर कारखानदारी प्रचंड संकटात असताना सरकारने त्यात राजकारण करता सर्वच कारखान्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे. त्यामुळे एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांच्या उसाला भाव देणे शक्य होईल. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने सरकारने मदत दिली पाहिजे. तसेच राज्यात उसाप्रमाणेच दूध दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. २६ रुपयांवरून १८ रुपयांवर दुधाचा भाव खाली आला आहे. त्यामुळे दुधाचा धंदा मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

गोदावरी खोर्‍यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावायचा असेल तर घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून ते पूर्वेकडे वळविण्याची गरज आहे.तसे झाल्यास उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचाही पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागेल,असे पवार म्हणाले.

क्रॉस व्होटिंगमुळे हार
बारामतीयेथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आपल्या पॅनलचा पराभव केवळ क्रॉस वोटिंगमुळेच झाला आहे. हा पराभव भाजप-सेनेने केलेला नाही, तर आमच्याच माणसांनी आमचा पराभव केला आहे. , असे पवारांनी शेवटी सांगितले. बारामती कारखाना निवडणुकीत पवारांचे पॅनेल मोठ्या फरकाने पराभूत झाले आहे.

चौकशी होऊनच जाऊ द्या
मराठवाडाआणि विदर्भाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण सिंचन मंत्री असताना जायकवाडीपासून ते थेट बाभळीपर्यंत गोदावरी नदीवर ठिकठिकाणी पाणी अडवण्याच्या योजना राबवल्या. मात्र, तेव्हाचे विरोधी आणि आजचे सत्ताधारी सरकारने माझीच चौकशी सुरू केली आहे. सरकारने एकदाची चौकशी पूर्ण करावीच म्हणजे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असे प्रतीआव्हानही अजित पवार यांनी सरकारला दिले.

अजित पवारांची विखे-कदम यांच्यावर स्तुतिसुमन : पवार-विखे, पवार-कदम या घराण्यांमध्ये राजकीय वाद अनेक दशकांपासून राज्याने पाहिला आहे. बाळासाहेब विखे पाटील डॉ. पतंगराव कदम यांना शंकरराव काळे कृषी-सहकार पुरस्कार देण्यात येणार होता. विखे आणि कदम दोघेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित होते. मात्र, बाळासाहे विखे यांच्या पत्नी सिंधुताई विखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अजित पवारांनी आपल्या भाषणात विखे पाटील आणि कदम यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या भाषणाची उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती.