आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akole Assembly Elections Election, Latest News In Divya Marathi

अकोल्यात पिचड व भाजपचे भांगरे यांच्यात झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार अशोक भांगरे यांच्या प्रचारासाठी भाजपच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची सभा माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निवासस्थान असलेल्या राजूर येथे रविवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता झाली. अकोल्यात खरी लढत अशोक भांगरे (भाजप), वैभव पिचड (राष्ट्रवादी) यांच्यात असून मधुकर तळपाडे (शिवसेना) हे या दोघांनाही जिकिरीची झुंज देत आहेत. तळपाडे यांना जेवढी जास्त मते पडतील, तेवढा फायदा राष्ट्रवादीचे पिचड यांना होईल, अशी चर्चा मतदारांमध्ये असल्याने भांगरे समर्थक प्रचाराची रणनीती ठरवताना दिसतात.
अकोले विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार पंकजा मुंडे यांच्या अकोल्यात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत सभा घेतली. राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची सभा वगळता कोणताही स्टार प्रचारक तालुक्यात फिरकला नाही. शिवसेनेच्या प्रचारासाठी प्रा. नितीन बानगुडे यांची हजेरी वगळता इतर कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा मतदारसंघात न झाल्याने मतदारांमध्ये भाजपचे उमेदवार भांगरे इतरांच्या तुलनेत प्रचारात आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी मुलाला निवडणुकीत उतरवल्याने पूर्वीसारखे एकतर्फी वातावरण त्यांना राहिलेले नाही. मतदारसंघातील लोक उमेदवारांची तुलना करून मतांचा कौल ठरवत असल्याने केवळ मंत्र्यांचा मुलगा म्हणून पिचडांच्या मुलाला सहानुभूती देण्यास उत्सुक नाहीत. काँग्रेसकडून नवीन चेहरा दिलेले सतीश नामदेव भांगरे यापूर्वी वास्तव्यास आळंदी देवाची येथे असल्याने मतदारांना ते फारसे परिचित नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी कोठे सभा होताना दिसत नाहीत. पाचवे उमेदवार माकपचे नामदेव गंगा भांगरे आहेत. त्यांना भाकपचा पाठिंबा आहे. त्यांचा प्रचाराचा भर मतदारसंघातील ठाकरवाड्या, आदिवासी व डोंगराळ पठार भागावरच अधिक आहे. तालुक्यातील माकपची वाढलेली ताकद राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी आहे.
अकोले मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे भौगोलिकदृष्ट्या पाच विभाग पडतात. आदिवासी, प्रवरा, आढळा, मुळा व पठार, संगमनेर तालुक्यातील घारगाव मंडल पठारात मोडते. आजपर्यंत पिचडांना पठार व आदिवासी भागानेच तारले. मुळा, प्रवरा, आढळा विभागातील बहुजन समाजाने तुलनेत पिचडांवर अधिक नाराजी व्यक्त केल्याने पिचडांना 1995 चा अपवाद वगळता नेहमीच काठावरचे मताधिक्य मिळाले आहे. तिरंगी लढतीचा फायदा मिळवणारे पिचड या वेळी आघाडी व युती तुटल्याने अडचणीत आहेत. आपली खरी लढत भांगरेंच्या विरोधात असल्याचे माहीत असतानाही ते सभांमधून वैभवची लढत तळपाडेंसोबत असल्याचे सांगतात.

मनसेच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष
काँग्रेस पक्षातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणारा एक गट आपल्या बाजूने प्रचार यंत्रणेत सक्रिय करण्यासाठी मधुकर पिचड यांना यश आले असले, तरी पठारावरील काँग्रेसची मते फुटणार नाहीत, याची काळजी आमदार थोरात घेताना दिसत आहेत. मनसेने अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नसल्याने ही मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलग सातवेळा या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जात अनेकदा राज्यात मंत्रिपदे उपभोगूनही आमदार पिचड यांना मुलाच्या विजयासाठी जिवाचे रान करावे लागत आहे.