आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढळातील पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवा, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - तालुक्यातील तिरढे, पाचपट्टा, मान्हेरे परिसरात पवनचक्क्यांची निर्मिती झाली तेव्हापासून आढळा परिसरात पाऊस हुलकावणी देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पवनचक्क्या बंद ठेवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे. मागील वर्षीही पावसाळ्यात पवनचक्क्यांपासून वीजनिर्मिती थांबवण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते.

तालुक्यातील आढळा परिसरातील देवठाण, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, हिवरगाव आंबरे, वीरगाव, सावरगावपाट, समशेरपूर, टाहाकारी, तांभोळ परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पाऊस कमी झाल्याने बागायती, खरीप व रब्बीही पीक मिळाले नाही. या वर्षी तालुक्याच्या इतर भागांत पाऊस असताना आढळा परिसर कोरडा आहे. पवनचक्क्या झाल्यानंतरच आढळा विभागाच्या पर्जन्यस्थितीत आमूलाग्र बदल झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पवनचक्क्यांपासून वीजनिर्मिती बंद ठेवावी, अशी मागणी होत आहे. पवनचक्क्या उभारण्यासाठी जंगलतोड झाली. त्यानंतर नव्याने एक झाडही लावले गेले नाही. पर्यावरणाचा र्‍हास झाल्याने आढळा भागातून पाऊस हद्दपार झाला, असे तांभेळ येथील शेतकरी वाल्मीक नवले यांनी सांगितले. पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, धनंजय संत यांच्या सह्या आहेत.

अभ्यास करण्याची गरज
महाराष्ट्रात इतत्रही पवनचक्क्या आहेत. पूर्वी तेथेही पर्जन्यमान कमी झाल्याने पवनचक्क्या बंद ठेवण्याची मागणी झाली. आढळा भागातही पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी झाल्याचे मत आहे. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी पावसाळ्यात काही दिवस पवनचक्क्या बंद कराव्यात. त्यानंतर हवामानातील बदल व अवकाश निरीक्षण करण्यात येऊन सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. ’’
अंजना बोंबले, सभापती, पंचायत समिती, अकोले.

पुन्हा डोंगर हिरवे करावेत
पवनचक्क्यांची निर्मिती झाल्यानंतर चार वर्षांत पाऊस कमी झाल्याच्या तक्रारी नव्हत्या. मात्र, नंतर जनतेतून पाऊस कमी झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. आढळा परिसरात कमी झालेल्या पावसाची कारणे शोधावीत आणि उजाड झालेल्या डोंगरांवर वृक्षलागवड करून ते पुन्हा हिरवे करावेत. कमी झालेल्या पर्जन्याचा शास्त्रीय शोध घ्यावा.’’ गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी.