आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमधील बड्या नेत्यांतील संघर्ष चिघळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यातील आठपैकी तीन नगरपालिकांची नगराध्यक्षपदे चार नगरपालिकांत सर्वाधिक नगरसेवकपदे मिळवत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यातील सर्वांत धक्कादायक निकाल राहाता नगरपालिकेतील सत्तांतराचा आहे. येथे भाजपने काँग्रेसच्या ताब्यातून दहा वर्षांनी सत्ता हिसकावून घेतली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महत्त्वपूर्ण अशा शिर्डी नगरपंचायतीची सत्ता युतीकडून हिसकावून घेण्यात विखे यांना यश आले आहे. या निकालानंतर काँग्रेसमधील बडे नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील जुने राजकीय वैर उफाळून आले आहे. निवडणुकीनंतर त्यांनी एकमेकांवर केलेली कडवट टीकाच सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. भविष्यात या संघर्षाला कोणते वळण मिळते, यावर जिल्ह्याच्या राजकारणाची वाटचाल ठरणार आहे.

राहात्यातील पराभव विखेंच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे थोरात यांनी टीका केल्यावर त्यांनी त्यांनी थेट थोरात यांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विखे यांनी प्रचारासाठी निवडणूक होत असलेल्या सर्व शहरांत प्रचार केला. थोरात यांनी मात्र संगमनेरच्या बाहेर जाणे टाळले. या दोघांतील संघर्ष उफाळल्याने त्याचा परिणाम लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीवरही होण्याची दाट शक्यता आहे. नगरपालिकांची निवडणूक तशी स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर लढली जाते. मात्र, या निवडणुकीला नोटाबंदीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील निर्णयाची पार्श्वभूमी होती. या निर्णयाची सामान्यांना झळ बसल्याने तिचा परिणाम भाजपच्या मतांवर होईल, असे भाजपविरोधी पक्ष म्हणत होते. मात्र, तसा कोणताही विपरित परिणाम भाजपच्या यशावर झालेला दिसत नाही. यावरून तो निर्णय जनतेने स्वीकारल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्ताने संबंधित कोणत्याही शहरातील नागरी प्रश्नांची प्रभावी चर्चा झाली नाही. कोणत्याही उमेदवाराकडे विकासाचा प्रभावी कार्यक्रम नव्हता. मात्र, जनतेने 'दगडापेक्षा वीट मऊ,' या न्यायाने विजयी उमेदवारांच्या पारड्यात आपली मते टाकल्याचे स्पष्ट होते.

यावेळच्या निवडणुकीत राहाता, श्रीरामपूर कोपरगावातील निकाल धक्कादायक आहेत. राहात्यात ऐनवेळी भाजपची उमेदवारी मिळवणाऱ्या ममता पिपाडा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. त्या दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाल्या आहेत. पिपाडा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या निष्ठावान गटाची नाराजी त्यांना अडचणीची होईल असा अनेकांचा होरा होता. मात्र, तो चुकीचा ठरला आहे.

नगराध्यक्षपदाबरोबरच पालिकेतही भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. पिपाडा भाजप यांच्या विजयाने विखे यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.
श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपद प्रथमच अनुरधा आदिक यांच्या रूपाने राष्ट्रवादीला मिळाले. नगराध्यक्षपदी त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पत्नी जयश्री यांचा पराभव केला. पालिकेत मात्र ससाणे गटाचे वर्चस्व आहे. अर्थात जे नगरसेवक निवडून आले, त्यांपैकी काही जण आदिक यांना मानणारे असल्याने आदिक यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी स्थिती आहे.

कोपरगावात आमदारकी स्नेहलता कोल्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पालिकेत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले, तरी भाजपचे बंडखोर उमेदवार विजय वहाडणे नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यामुळे पालिकेवर भाजपने सत्ता मिळवली असली तरी तिला गालबोट लागले आहे. कोल्हे गट वहाडणे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत असल्याने वहाडणे यापुढे कसा कारभार करतात, हे पाहणे आैत्सुुक्याचे ठरणार आहे.

शिर्डी येथे विखे गटाने शिवसेना भाजपच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेतली आहे. निवडणुकीपूर्वीच विखे यांचे कट्टर राजकीय विरोधक अभय शेळके यांना काँग्रेसमध्ये खेचण्यात विखे यशस्वी ठरले. त्यामुळे विरोधी शिवसेनेना मोठे खिंडार पडले. नागपूरनंतर संघाचा गड असलेल्या शिर्डीत विखेंच्या गटाने मुसंडी मारत विजय मिळवला.

पाथर्डीत आता भाजपवासी झालेल्या पूर्वीच्या काँग्रेसच्या माजी आमदार राजीव राजळे यांचीही प्रतिष्ठा येथे पणास लागली होती. त्यात राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज होता. तो फोल ठरला आहे. कारण नगराध्यक्षपद पालिकेची सत्ता भाजपच्या पदरात टाकण्यात राजळे यांना यश मिळाले. त्यात आमदार मोनिका राजळे यांचे कष्ट प्रतिमा कारणीभूत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पाथर्डी तालुका भाजप मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा आहे. त्यामुळे भाजपचे यश तसे अनपेक्षित म्हणता येणार नाही.

संगमनेरमध्ये अपेक्षेप्रमाणेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपले एकहाती वर्चस्व कायम राखले आहे. येथे झालेल्या तिरंगी लढतींचा त्यांना फायदा झाला आहे. विरोधकांना एकत्र येऊ देण्याचे त्यांचे राजकारण यावेळीही यशस्वी ठरले आहे. मात्र, कॉंग्रेसच्या मतांतील घट हा त्यांच्या चिंतेचा विषय ठरावा. त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे अपेक्षेप्रमाणेच नगराध्यक्षा झाल्या आहेत.
राहुरीत तनपुरे गटाविरोधात विखे आमदार कर्डिले यांनी आघाडी केली होती. अशा संधीसाधू आघाडीला राहुरीकरांनी पूर्णपणे नाकारून माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. त्यांनी जनविकास आघाडीच्या नावाने निवडणूक लढवली होती.

विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. उषा तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. प्रसाद तनपुरे यांनी मात्र राष्ट्रवादी सोडल्याचे कधीही जाहीर केले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना बऱ्यापैकी तटस्त राहिली. पण, तनपुरे यांंचा राजकीय पक्ष कोणता, ही संशोधनाची बाब ठरावी. काहीही असो, या यशामुळे तनपुरे यांच्या तालुक्यातील मरगळलेल्या राजकारणाला उर्जितावस्था आली आहे. असे असले, तरी त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने सामान्यांशी जोडली गेलेली आपली नाळ मजबूत करावी लागणार आहे.

देवळाली प्रवरा येथे अपेक्षेप्रमाणे कदम घराण्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावरच दे‌वळालीकरांनी विश्वास दाखवला आहे. याचे कारण त्यांची पक्षनिष्ठा स्वच्छ प्रतिमा कारणीभूत आहे. विरोधकांनाही त्यांच्यावर आरोप करता येणे, हे त्यांच्या या प्रतिमेचे यश आहे.

जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये या यशामुळे उत्साह संचारला आहे. अर्थात भाजपचे यश हे कोपरगावात कोल्हे, पाथर्डीत राजळेंसारख्या स्थानिक प्रस्थापित नेतृत्वाचे आहे, हे त्यांनी विसरू नये.
नोटाबंदीचा लाभ मतदारांना!
या निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ५०० १००० रुपयांच्या नोटांच्या बंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे पैशांचा अक्षरश: महापूर वाहिला. एका मताचा दर दोन ते अडीच हजारांवर गेला होता. सामान्यांना ही रक्कम बदलणे सहज शक्य असल्याने उमेदवारांनीही काळ्याचे पाढरे करण्याची संधी सोडली नाही. पैसाच खर्च करायचा असल्याने वजनदार उमेदवारांना कार्यकर्त्यांची वानवा जाणवली नाही.


विखे-थोरात यांच्यात जुंपली
या निवडणुकीचे कवित्व पुढील काळ चालण्याचे संकेत या निवडणुकीच्या निकालानंतर लगेच मिळाले आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंवर ते भाजपला बळ देत असल्याची जोरदार टीका केली. तिला लगेच विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विखे थोरात एकाच पक्षात असले, तरी त्यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. पुढील काळात या संघर्षाची धार वाढली तर आश्चर्य वाटू नये.
बातम्या आणखी आहेत...