आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alamgir Museum Open To All Tourist Issue, Divya Marathi

नगरचा इतिहास जपणारे आलमगीर संग्रहालय उद्यापासून खुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऐतिहासिक अहमदनगर शहराचा इतिहास, येथील वास्तू आणि गौरवास्पद ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी दारूल उलुम अहमदनगर, आलमगीर संस्थेतर्फे ‘आलमगीर म्युझियम’ हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. नगर शहराच्या स्थापना दिनी 28 मे रोजी सकाळी 11 वाजता इतिहास संशोधकांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शकूर शेख यांनी सोमवारी दिली.

नगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. 28 मे 1490 रोजी मलिक अहमद निझामशहा यांनी शहराच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात नगर इतके समृद्ध होते की, या शहराची तुलना बगदाद व कैरोसारख्या जगातील सुंदर शहरांशी होत असे. नगर शहराला फारसी, उर्दू व अरबी संस्कृतीचा मोठा वारसा आहे, पण काळाच्या ओघात याचा विसर पडत चालला आहे. हा वारसा कायमस्वरूपी जतन करून त्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या महान शहराचा लुप्त झालेला इतिहास जिवंत करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे शेख यांनी सांगितले.
मोगल बादशहा औरंगजेब नगरमध्ये वास्तव्यास असताना ज्या ठिकाणी दरबार भरवला जाई, त्या ‘बारादरी’ वास्तूत हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू जाळ्या लावून बंदिस्त करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आलमगीर परिसर दोन एकरांचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संग्रहालयाचे उद्घाटन आमदार मौलाना मुफ्ती महंमद ईस्माईल यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील मौलाना आझाद कॉलेजचे इतिहास विभागप्रमुख डॉ. मिर्झा खिजर असतील. इतिहास तज्ज्ञ व लेखक डॉ. मिर्झा अस्लम बेग, डॉ. मौलाना सदरुल हसन नदवी मदनी, पत्रकार भूषण देशमुख, प्रा. अ‍ॅड. इकबाल काझी, मौलाना अख्तर साहब कासमी आदी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास इतिहासप्रेमी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

अरबी व फारसी भाषेतील हस्तलिखिते, पुरातन नाणी, शस्त्रे, भांडी, तसेच युद्धसाहित्य या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. निझामशाहीतील ऐतिहासिक वास्तूंचा माहितीपटही तेथे पाहायला मिळेल. शुक्रवार व्यतिरिक्त दररोज सकाळी 8 ते 12 व दुपारी 2 ते 5 या वेळात संग्रहालय सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. संग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. ज्यांच्याकडे ऐतिहासिक वस्तू असतील त्यांनी अंशकालासाठी अथवा दान देऊन संग्रहालय वाढीत योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.