आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावमधील बनावट मद्यविक्री रॅकेट उजेडात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विदेशी मद्याच्या नावाखाली खोटे लेबल व झाकण लावून शासनाची व लोकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी गजाआड केले. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केडगावमधील भूषणनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बनावट विदेशी मद्यविक्रीचे रॅकेट उजेडात आले आहे.
सागर वसंत चवंडके (२७, गवळीवाडा, भिंगार) व गणेश बबन पेटारे (२४, आदर्श गौतमनगर, रेल्वे स्टेशन) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे केडगाव शिवारात भूषणनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ भुजबळ बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत बनावट विदेशी मद्यविक्रीचे रॅकेट चालवत होते. याची खबर पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिस अधीक्षक लखमी गौतम व शहर विभागाचे पोलिस उपधीक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी तेथे छापा टाकला.
छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या विदेशी मद्याच्या बाटल्या, एक बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच १६ एपी ४७००), खोटी झाकणे व लेबल्स आढळून आली. रिकाम्या बाटल्यांमध्ये विदेशी मद्य भरून त्यांची विक्री केली जात असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिस नाईक दीपक गाडिलकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणूक, दारूबंदी, कॉपीराइट, ट्रेडमार्क कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक भरत जाधव करत आहेत. पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी झाडाझडती घेतल्यामुळे पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवली आहे. त्यामुळे अवैध धंदे उजेडात येत आहेत.
कोबिंग ऑपरेशन
पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या सूचनेनुसार शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कोतवाली पोलिसांनी विकी ढोल्या चव्हाण (१९, अरणगाव) याला ताब्यात घेतले. तो बुरुडगाव रस्त्यावरील टीसीआय गोदामाजवळ संशयास्पदरीत्या फिरत होता. विकास किसन जगताप (३८, सिद्धार्थनगर) यालाही शनिवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी विजय रावसाहेब कराळे, रोहिदास हरिभाऊ घाडगे व ज्ञानेश्वर नामदेव भिंगारदिवे यांना इमामपूर घाटात संशयास्पदरीत्या फिरताना ताब्यात घेतले.