आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनतेचा उद्रेक: विविध आंदोलनांनी दणाणले नगर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारिप बहुजन महासंघ, भारतीय लहुजी सेना, पत्रकार संघटना या संघटनांच्या वतीने सोमवार (25 मार्च) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, उपोषण करण्यात आले, तर छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या न्यू आर्टस् महाविद्यालयात निदर्शने करण्यात आली.

नगर जिल्ह्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. र्शीरामपूर येथे एका दलित महिलेवर अत्याचार करण्यात आला. नेवासे तालुक्यातील सोनई येथे तीन दलित युवकांची व शेवगाव तालुक्यात एका दलिताची हत्या करण्यात आली. र्शीगोंदे येथील लिंपणगाव येथे पारधी समाजाच्या घराची मोडतोड करण्यात आली. जामखेड येथे एका दलिताची हत्या करण्यात आली. या अत्याचाराच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली चांदणे व महासचिव रमेश खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली.

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर अर्बन बँकेकडून होत असल्याच्या अन्यायाविरोधात उपोषण करण्यात आले. भारतीय लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब बागूल यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले. हनिफ पठाण, सुरेश अडागळे, साहेबराव कोते, किरण शिंदे, सुनील सकट, सुनंदा देठे, विमल भोरे, कमल वंजारे, प्रमिला मकासरे, मीना गायकवाड, शाश्वत देठे व संदेश देठे उपोषणास बसले आहेत. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे घेतलेले परीक्षा शुल्क परत द्यावे, या मागणीसाठी पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली.

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे व एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरोधात विधानसभेत दाखल झालेल्या हक्कभंगाच्या निषेधार्थ सोमवार (25 मार्च) रोजी नगर प्रेस क्लब व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एस. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबई पत्रकार परिषदेच्या कार्यालयात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.संजीव दायमा, सुधीर लंके, दीपक कांबळे, विजय दुधभाते, सुदाम देशमुख, बबलू शेख, प्रकाश कुलकर्णी, कैलास ढोले, सुशील थोरात, सचिन आगरवाल, अरुण वाघमोडे, राजेंद्र त्रिमुखे, रोहित वाळके, कल्पक हातवळणे, निखिल चौकर, सागर दुस्सल, सचिन शिंदे, महेश देशपांडे, प्रकाश सावेडकर, संजय सावंत, राजेश सटाणकर, सरवर तांबटकर, वाजिद शेख, उदय जोशी, जाकीर शेख, संतोष आवारे, राजू शेख आदी यावेळी उपस्थित होते.

निवेदनाची होळी..
भारिप बहुजन महासंघाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रवेशद्वारावर या मोर्चाला पोलिसांनी अडवले. त्यानंतर निवेदन देण्यासाठी महासंघाच्या काही पदाधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्यात आले. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी या पदाधिकार्‍यांना बसण्यासाठी सांगितले. बराच वेळ हे पदाधिकारी कार्यालयात बसले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे निवेदन न घेता ते गेले. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निवेदनाची होळी केली.

अन्यथा उपकेंद्र बंद पाडू
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच घेतलेले परीक्षा शुल्क मागे द्यावे. राज्यभरात प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार तातडीने मागे घेण्याची गरज आहे. परीक्षा शुल्क तातडीने परत न केल्यास उपकेंद्र बंद पाडू.’’ केदार भोपे, शहराध्यक्ष, छात्रभारती.