आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: 570 ‘बार’ला लागणार टाळे, महामार्गांवरील बार बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्य राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेले सर्व बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यातील तब्बल ५७० बारना टाळे लागणार आहे. त्यात महापालिका हद्दीतील हॉटेलांची संख्या अधिक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने समिती स्थापन करून या बारचे मोजमाप घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या कार्यवाहीनंतर कोणत्याही क्षणी बार बंद करण्याच्या नोटिसा बारमालकांच्या हातात पडतील. त्यामुळे बारमालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने महामार्गांवरील बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बार बंद होणार आहेत. नगर जिल्ह्यात असे ८०२ बार असून त्यापैकी ५७० बारना कायमचे कुलूप लागणार आहे. 

शहर जिल्ह्यातील हे सर्व बार महामार्गाला लागूनच आहेत. त्यात शहरातील बारची संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सुरू केली असून त्यासाठी समितीची स्थापना केली आहे. या समितीमार्फत महामार्गांवरील सर्व बारची मोजणी सुरू करण्यात आली. लवकरच बारमालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. 

दरम्यान, शहरातील काही बारमालकांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला अद्याप मिळालेले नाहीत. असे असले तरी या विभागाकडून मोजणी, तसेच इतर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रिट याचिका कोर्टाने फेटाळली, तर कोणत्याही क्षणी बार बंद करण्याच्या नोटिसा बारमालकांच्या हातात पडतील. कोर्टाच्या आदेशाने बारमालकांची आधीच झोप उडाली आहे. त्यात राज्य उत्पादन विभागाने मोजणीची कार्यवाही सुरू केल्याने बारमालक हवालदिल झाले आहेत. 

पुढील आदेश येताच कार्यवाही 
शहर जिल्ह्यात ८०२ बार असून त्यापैकी ५७० बार महामार्गापासून ५०० मीटर अंतरात आहेत. त्यामुळे ते बंद करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येणार आहे. या बारच्या मोजणीचे काम समितीमार्फत सुरू असून पुढील आदेश आल्यानंतर बारमालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.'' भाग्यश्रीजाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग. 

या प्रमुख ‘बार’ला कुलूप 
शहरातअनेक मोठी हॉटेल्स असून तेथील बार नेहमीच हाऊसफुल्ल असतात. त्यात यश पॅलेस, यश ग्रॅण्ड, सगम, पुष्पक, संदीप, निशा पॅलेस, अर्चना, दामोदर, अंबर, कीर्ती, परिचय, यशांजली, सनी, चेतना, पंचम वाईन शॉप, प्रकाश वाईन शॉप, डिलक्स वाईन शॉप यासारख्या प्रमुख हॉटेलमधील बारला देखील कुलूप लागणार आहे. काही हॉटेलमालकांनी स्थलांतर करण्याचा दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

शहरात बारमालकांची लॉबी सक्रिय 
शहरातूननगर-मनमाड, नगर-औरंगाबाद, नगर-पुणे, नगर-जामखेड, नगर-सोलापूर, नगर-कल्याण, नगर- दौंड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिकेने ताब्यात घ्यावेत, यासाठी बारमालकांची लॉबी सक्रिय झाली आहे. हे महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आले, तर बारमालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढता येईल. कोर्टाच्या आदेशापूर्वीच महामार्ग ताब्यात घेण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु महामार्गांच्या देखभाल, दुरूस्तीचा खर्च महापालिकेला परवडणार नसल्याने अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावास विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला, परंतु आता कोर्टाच्या आदेशामुळे बारमालकांची लॉबी सक्रिय झाली असून हा प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर ठेवून तो मंजूर करावा, यासाठी ही लॉबी प्रयत्नशील आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...